Posts

Showing posts from July, 2009

मी दावा करत नाही असा की...

मी दावा करत नाही असा की सगळेच्या सगळे प्रश्न सुटतील शब्दांच्या एका फटका-यानिशी... किंवा नेहमीच माझ्यापाशी असलेल्या शाईतून उचंबळून प्रसवतील सगळीच्या सगळी असलेल्या नसलेल्या प्रश्नांची सगळीच उत्तरं... मी प्रश्नांची माळ ओवण्यासाठी लिहित नाही कविता फावल्या वेळातल्या एखाद्या बेकार छंदासाठी... किंवा माझी कविता मागेही लागत नाही उत्तरांच्या हात धुवून चार घासांची ढेकर दिल्याशिवाय. पण, लपतछपत का होईना; माझी कविता कुरतडू पाहते माझ्यावरच्या सतराशेसाठ मध्यमवर्गीय अवस्थांचे आवरण आणि पांघरून देते मला एखाद्या चिलखतासारखी - जिथं मी अनुभवू शकतो आईच्या गर्भातली माझ्या हक्काची उब... निर्भय ,निरंतर आणि निष्पाप!

दार

नाही वाटंत असं आजकाल की घटनांच्या काळ्यापांढर् या कागदावर उमटवून द्यायलाच हवेत शब्दांचे शतरंगी शिक्के ... ' आहे हे असं आहे ' असंच मानून चालायचं तर मग बसतीलच कसे अपेक्षाभंगाचे अनपेक्षित धक्के ? ‍ आपण आपलं एक स्थितप्रज्ञ दार व्हावं कोसळलेल्या भिंतींमधलं ... म्हणजे कसं होईल की ' नसलेल्या घरात अमुक अमुक दिशेनेच पाऊल टाकायला हवं ' ह्या परंपरेतून सुटका होईल नसलेल्या घरात येणार् यांची आणि नसलेल्या घरातून बाहेर जाणार् यांची ... तरीही तोपर्यंत मोक्ष मिळाल्याचा दावा करू नये आपण जोपर्यंत कोणी बांधत नाही दाराला एखाद्या कवितेचं तोरण ! ‍‍

आठवण

ही भरदुपारची आठववेळ... कोणत्यातरी अमलताशला खुपावी नितांत पिवळ्याधमक फुलांची रास तश्या तुझ्या आठवणी माझ्या मीभर पसरलेल्या. आताशा मी उन्हाकडे तक्रार करत नाही कसलीच, जळणार्‍या भोवतालात माझं हे असं एकटयाचं लाहीलाही उमलून फुलणं... पानगळीला पोरकं होणं! मी फक्त वाट पाहत राहतो आतून आतून आतून खचण्याची. तू मला एकदातरी वेचण्याची.

हे असं नशीबाशी ऍग्रीमेन्ट करून

हे असं नशीबाशी ऍग्रीमेन्ट करून आयुष्य जगवत राहाणं भाडेक-यासारखं... थकूनभागून घरी यावं आणि पडून राहण्याचा प्रयत्न करावा शांतपणे इथल्या गदारोळात... किंवा लॅपटॉपवर पाहावीत चित्र, ऐकावीत गाणी, टीव्ही वर ठासून पाहाव्यात ब्रेकींग न्यूज, जाळपोळ, दगडफेक, दंगल, उभे आडवे सेन्सेक्सचे ग्राफ्स रियालीटी शोजची नेहमीची किचकिच आणि झोपून जावे अंधाराच्या कुशीत सेटलमेन्टची बापजादी खानदानी स्वप्ने मळक्या उशीप्रमाणे डोक्याखाली घेत सकाळच्या अलार्मसाठी मोबाईलमधला 'नाशिक ढोल' जागता ठेवून... आपला असा होऊन गेलेला एक मशिनमय अवतार... विचारू नये कधी स्वतःलाही प्रश्न की - कोणत्या पिढीजात इंधनावर निरंतर धावपळ करतात, चालू राहतात माणसं? दुःखाचा FSI तरी किती? आपल्या एक्सपायरी डेटच्या अगोदर शक्य तितके पाहून घ्यावेत माणसांचे वॉलपेपर, 'चिमणी चिमणी खोपा दे' म्हणत फेडत राहावीत शक्य तितकी कर्जं. उघडून पाहाव्यात नव्या जुन्या इच्छांच्या फाईल्स आणि टेबलच्या ड्रॉवरमधल्या काळोखात ठेवून द्याव्यात घुसमटून. दिवस असे लादल्यासारखे येतात आणि निघूनही जातात संथ लाटेसारखे - आपल्या वीतभर किना-यावर वाळूची नक्षी मांडून…...

निःपक्ष

वेळ लागतो जोखायला पाऊस, त्याची एकेक सर..त्याचा एकेक थेंब.. जोडू म्हणता म्हणता काळाचा तडा गेलेला आरसा होत नाही पुन्हा नव्याने पूर्ववत... पायांखालची जमीन सांधता सांधता दुभंगतो चेहरामोहरा नखशिखांत! नुसत्या क्लिकवर स्वॅप करता येत नाही कल्पना आणि वास्तव... कंटाळा येतो सगळ्याच शब्दांचा, कविता रेटण्याचा, फूल, पाणी, चंद्र, नदी, मी, तू ... 'अ' 'अ' 'आई'चा गिरवता गिरवता मशिन्सच्या लगद्यात कुठे हरवून जातात जगण्यातील निरागस निःपक्ष अक्षरं?

बोन्साय - 2

बोन्साय ला काल जवळजवळ आगच लागली. जंगलात वणवा लागतो. इथं फक्त चरचराट झाला नुसता.हल्ली फार काम नाही कंपनीत. पगार अजून तरी चालूच आहे हीच काय तेवढी समाधानाची बाब. अश्या दिवसात बोन्साय फारच बहरतात. नको तितके. बोन्सायचीही पानगळ होतेच कधातरी. पण पानंच सगळीच्या सगळी प्लॅस्टिकची लावली असल्यावर कसली आलीय डोंबलाची पानगळ? अश्या प्लॅस्टिकला वास नसतो. फक्त रंग असतो. विकत घेतलेल्या स्प्रेचे दोन चार फवारे..तेवढाच काय तो वास. बाकीचं सगळं काही गंधहीन. प्रतिष्ठेच्या रंगात डुचमळलेलं... इथं कसल्याच गोष्टीत नैसर्गिकता नाही. सगळं कसं ओढून ताणून फिट्ट बसवल्यासारखं वाटतं. कंटाळा येतो अश्या अवस्थेचा. मी फार फार तर दोन दिवस जपून पाहतो अश्या सगळ्या गोष्टी. हा हॅंगओव्हरचा वारसा बापजाद्यांपासून चालत आलेला. मी म्हटलं झालं ते खूप झालं. च्यायला! किती दिवस मी तरी गोड न राहिलेल्या सारखेची, खारट न राहिलेल्या मिठाची, तिखट न राहिलेल्या चटणीची तीच तीच तीच तीच शिळी रेसिपि आचेवर धुमसत ठेवू? काही दिवसांपूर्वी मीच स्वतः लिहिलं होतं की हल्ली स्वतःच्या आयुष्याविषयी तिरस्कृत लिहिण्याची फॅशनच झाली आहे. आज पुन्हा तेच. पण मी तरी काय...