हे असं नशीबाशी ऍग्रीमेन्ट करून

हे असं नशीबाशी ऍग्रीमेन्ट करून
आयुष्य जगवत राहाणं भाडेक-यासारखं...

थकूनभागून घरी यावं आणि पडून राहण्याचा
प्रयत्न करावा शांतपणे इथल्या गदारोळात...
किंवा लॅपटॉपवर पाहावीत चित्र, ऐकावीत गाणी,
टीव्ही वर ठासून पाहाव्यात ब्रेकींग न्यूज,
जाळपोळ, दगडफेक, दंगल, उभे आडवे सेन्सेक्सचे ग्राफ्स
रियालीटी शोजची नेहमीची किचकिच
आणि झोपून जावे अंधाराच्या कुशीत
सेटलमेन्टची बापजादी खानदानी स्वप्ने
मळक्या उशीप्रमाणे डोक्याखाली घेत
सकाळच्या अलार्मसाठी मोबाईलमधला 'नाशिक ढोल' जागता ठेवून...
आपला असा होऊन गेलेला एक मशिनमय अवतार...
विचारू नये कधी स्वतःलाही प्रश्न की -
कोणत्या पिढीजात इंधनावर निरंतर धावपळ करतात,
चालू राहतात माणसं? दुःखाचा FSI तरी किती?
आपल्या एक्सपायरी डेटच्या अगोदर
शक्य तितके पाहून घ्यावेत माणसांचे वॉलपेपर,
'चिमणी चिमणी खोपा दे' म्हणत
फेडत राहावीत शक्य तितकी कर्जं.
उघडून पाहाव्यात नव्या जुन्या इच्छांच्या फाईल्स
आणि टेबलच्या ड्रॉवरमधल्या काळोखात
ठेवून द्याव्यात घुसमटून.
दिवस असे लादल्यासारखे येतात आणि
निघूनही जातात संथ लाटेसारखे -
आपल्या वीतभर किना-यावर वाळूची नक्षी मांडून…
आपण शक्य तोवर उमटवत ठेवावेत
तळपायांचे ठसे...
न जाणो शतकांच्या उत्खननानंतर तरी गवसतील
आपल्या चाकरमानी आयुष्याच्या भाकरीएवढ्या कथा!

Comments

Popular posts from this blog

नामदेव ढसाळ : विद्रोहाचे भाषेचे करुणेचे मूर्तीमंत प्रतिरूप!

स्ट्रॉबेरी

भाकरी, पूरणपोळी आणि पिझ्झा!