सोलापूर माढा पुणे...
सोलापूर, माढा आणि पुणे ह्या तीन ठिकाणातच माझ्या आत्तापर्यंतच्या तीस वर्षीय आयुष्यातला ९९.१७% टक्के वेळ गेलेला आहे. ह्या तिन्ही ठिकाणांचा माझ्या आयुष्यावर भयंकर प्रभाव आहे.
सोलापुरनं मला वरकरणी कितीही रिकामचोट भिकारचोट भकास धूळग्रस्त दुष्काळी वाटू शकना-या आयुष्यात सॉल्लीड आनंदानं कसं जगायचं हे शिकवलं. त्यातल्या त्यात माझं घर हद्दवाढ भागातलं असल्यानं मी शहरात राहतोय का खेड्यात ह्याचं बेमालूम कन्फ्यूजन करून मला नेहमीच औकातीत ठेवलं. मुतायची भिती वाटावी असा उन्हाळा कश्याला म्हणतात, थोबाडाला भेगा पाडणारी धुळीची बोचरी निब्बर थंडी कशी असते, नुसती आभाळभर उंडारनारी ढगंच्या ढगं कित्तीही जीव खाऊन गांड आवळून डरकाळली तरी झ्याट पाऊस पडत नसतो हे सर्व सोलापूरनंच मला दाखवलं! आज होईल उद्द्या होईल म्हणत म्हणत वर्षानुवर्षे उखडून ठेवलेल्या दगडी रस्त्यांवर नुसती साइडला पोतंभर खड़ी आन एक पिंप डांबर दिसलं तरी खुश होणारी लोकं, किमान आठदहा तास लोडशेडिंगच्या फटक्यातून कधीमधी चुकून अर्धाएखाद तास आधीच लाइट आली तर झटका बसणारी खुश लोकं, एखादा दिवस नळाला जास्त प्रेशरनं पाणी आलं की जमतील तितकी एक्सट्रा हंडा कळश्या पातेली भरणारी खुश लोकं, गड्डयाच्या जत्रेत एस्सेल वर्ल्ड शोधणारी खुश लोकं... हे सारं औकातीत राहायचं शिक्षण सोलापुरनंच मला दिलंय. आठवीत असताना मुद्दाम "तुझी जात कोणती रे?" असं विचारणा-या एका सो कॉल्ड उच्चजातीय मित्राच्या आईला "कश्याला आसले कडू प्रश्न विचारायलाय ओ कडू काकू?" म्हणत असल्या फुकन्यांना जागच्या जागी उडवून लावण्याचं अफाट माजोरडं बळ सोलापूरनंच मला दिलंय!
पुण्यानं मला जगाच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत धावायला तगड़ेच्या तगड़े पाय दिले. सिओईपी सारखं ग्र्यान्ड कॉलेज दिलं. पुण्यानं माझ्यासारख्या दुष्काळी पोराला अमाप हिरवळ दिली. प्रेम करायचं धाडस दिलं. भाकरी दिली. पिझ्झा दिला. बायको दिली. पैसा दिला. घर दिलं. चोवीस तास पाणी दिलं, लाइट दिली. जबर सुखसोयी दिल्या. स्टाइलिशपना दिला. सांगली सातारा लातूर कोल्हापुर, विदर्भातनं आलेले भन्नाट दोस्त दिले. पेठेतल्या लोकलाइट पोरांशी त्यांच्यापेक्षाही 'अतिशुद्ध अलंकारिक' भाषा बोलायचं तंत्र दिलं. कोस्मोपॉलिटियन मेट्रो लोकांत वावरायचा आत्मविश्वास दिला. WTF सारख्या हायफाय पबडिस्क मध्ये 'व्हाट दा फक, अंग्रेजी बिट तेह' म्हणत टकीला शॉटवर बेभान थिरकायच्या पार्ट्या दिल्या. कोडग्या अन संवेदनशील दोन्ही प्रकारच्या लोकांचा घोळका दिला. पुण्यानं मला लिहिण्याची वाचण्याची जाणीव दिली. पुस्तकंच्या पुस्तकं दिली...
माढा माझं मूळ गाव. शेकडो सरकारं आली अन गेली तरी काही गावं आणि त्या गावाला जाणा-या ST यष्टयांची स्थिती कधीच बदलंत नसते. हेही जवळपास त्यातलंच एक. चावड़ी, महारवाड़ा म्हणजे काय हे माढयानं मला दाखवलं. दारिद्र्याच्या गडद काळोखात जिद्दिनं पेटून जगणारी माणसं दाखवली. तशीच दारूत बुडून आयुष्याची प्रेतं निष्काळजीपणे तरंगवणारे चिक्कार दाखवले. डूकरांच्या झुंडीमागे ऊर फुटेस्तोवर धावणारे कित्येक अनवानी रक्ताळ पायांचे बेनाम जब्या दाखवले. भले आज मी पॉश चकचकित जग्वार फिटिंग बाथरूमच्या कमोडवर बसतो पण माढयानेच मला हागंदरीतसुद्धा न लाजता बसायची जबर हिम्मत दिली.
माझी कित्येक शतकांची मुळं माढ्यात् रुजली आहेत ह्याचं सामाजिक भान दिलं. कितीही उंच उडालो तरी पाय जमिनीत रुतवून ठेवायची ताकीद दिली.
तर मी असा अत्यंत हायब्रिड. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी ह्या तीन ठिकाणांतला भाकरीचपातीपिझ्झामय ग्रामीणनिमग्रामीणनिमशहरीकोस्मोपोलिटियन माणूस सोबत घेउनच मी वावरत आलोय. तीच माझी खरी ओळख अन् ताकद आहे...
Comments