नामदेव ढसाळ : विद्रोहाचे भाषेचे करुणेचे मूर्तीमंत प्रतिरूप!
नामदेव ढसाळ हे व्यक्तिमत्व निवळ साहित्यिक, महाकवी, राजकारणी एवढेच मर्यादीत नसून नामदेव ढसाळ हे नाव हजारो वर्षे इथल्या धर्माने, जातीने, कर्मकांडाने माणुसकिच्या गावकुसाबाहेर निरंतर सडवत ठेवलेल्या हजारो पिढ्यांचा अजरामर बंडखोर भाष्यकार आहे. हिंदू वर्णव्यवस्थेने समाजाच्या ज्या मोठ्या समूहाला जनावरांचेही नैसर्गिक जगणे शेवटच्या माणसासाठी थोर ठरावे इतक्या अमानुष तर्हेने समाजाच्या सर्व क्षेत्रातून कायम नासवले, अस्पृश्य माणसाचे जगणे आणि मरणेही टाचा घासून तडफड करत जीव सोडणार्या एखाद्या प्राण्याच्या अवस्थेहून बत्तर केले गेले, नामदेव ढसाळ हा त्या तमाम गावकूसाबाहेर फेकल्या गेलेल्या घटकांचा लढवय्या भाष्यकार आणि सार्वकालिक इतिहासकार आहे. फॅन्ड्री मधल्या जब्याने ज्या ताकदीने आणि त्वेषाने दगड भिरकावला त्याच ताकदीने ढसाळांच्या प्रत्येक शब्दांचा अंगार माणुसकीला मोताद झालेल्या ह्या गावावर जळजळीतपणे कोसळत राहिला, इथल्या व्यवस्थेच्या तंटबंदीला मूळापासून उखडून उध्वस्त करत राहिला आणि अंतिमत: ‘माणसाचेच गाणे माणसाने गावे’ ह्या ओळी गुणगुणत नामदेव ढसाळांचे शब्द माणुसकीचे, सम्यकतेचे आकाश विस्तारत राहिले.
ढसाळ हे नुसतेच मराठी वा भारतीय साहित्यातले साहित्यिक वा महाकवी ठरत नाहीत, तर हा माणूस जागतिक साहित्याच्याही कैक चौकटी ओलांडून कायमच वैश्विक ठरतो. “ह्या रांडाव मराठी भाषेला सवाष्ण होताना पाहीचंय मला” अशी जिद्द बाळगत, मुद्द्याला मुद्दा, गुद्द्याला गुद्दा, ठोश्याला ठोसा देत, रस्त्यावरची लढाई मजबूत लढत, विद्रोहास ज्ञानाला समानार्थी शब्द ठरलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ठोस अधिष्ठान देत, आजवरच्या फक्त अभिजनांच्याच अभिजात ठरवल्या गेलेल्या सर्व समग्र सोयिस्कर साहित्याचा थरकापतेने पालापोचाळा उडावा, प्रतिभेला आपल्या घरी पाणी भरायला ठेवल्यागत माज करणार्या, ‘रसाळ नामदेवांचा काळ जाऊन ढसाळ नामदेवांचा काळ आला’ असा भयप्र्द उपहास करणार्या तमाम साहित्यिकांची आणि वाचकांचीही कातडी सोलवटून निघावी, इतक्या प्रचंड आत्मियतेने, जिद्दीने, प्रेमाने आणि बुद्धाच्या करुणेने, प्रमाण म्हणवल्या जाणार्या, प्रमाण म्हणून अट्टहासाने ठसवल्या जाणार्या सवर्णांकीत भाषेचा कोथळा बाहेर काढून तिला पायासकट उखडून काढतात, तिची अस्पृश्य शोषित वंचित बहुजन समाजासाठी पुनर्बांधणी पुनर्रचना करतात तेव्हा ढसाळ हे भाषेच्याही कसल्याही बंधनाच्या पलीकडे जाऊन पोहोचलेले माणुसकीचे दु:खाचे क्रांतीचे भाष्यकार ठरतात. ‘तुमच्या उध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार’ असे सडेतोड सांगत, ‘मी नमतोय फक्त तुमच्यापुढे प्रारंभ आणि अस्त’ असे सडेतोड कबूल करत, शेवटी ‘तुम्ही माझ्या आया व्हा, तुमच्या फदफदत्या कुशीत मला निवारा द्या’ अशी विद्रोहाला बुद्धाच्या करुणेची जोड देत नामदेव ढसाळ हे व्यक्तिमत्व स्व:ताच विद्रोहाचे भाषेचे करुणेचे मूर्तीमंत प्रतिरूप ठरते.
नामदेव ढसाळांची कविता म्हणूनच एक स्वतंत्र भाषा ठरते, समग्र माणुसकीचा अवकाश व्यापणारी ती एक स्वतंत्र लिपी ठरते. भाषा मांडणीची कितीही माध्यमे आली आणि गेली, तंत्रज्ञानाने काळ आणि वर्तमान कितीही व्यापला गेला तरी जगात जोवर शोषक आणि शोषित ह्यांचा लढा अस्तित्वात आहे तोवर नामदेव ढसाळ हे नाव आणि त्यांची ही कविता नेहमीच अजरामर ठरेल.
आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांनी शून्यातून निर्माण केलेल्या विद्रोहाला, स्वाभिमानाला ‘तुझे बोट धरून चाललो आहे मी’ अशी बळकट खात्री देत आणि अविरत हिंमत बाळगत शब्दातून, ज्ञानातून, राजकारणातून, समाजकारणातून समतेचा आणि समानतेचा लढा लढणार्या ह्या पॅंथरला विनम्र अभिवादन!
Comments