पुस्तकं आणि पुस्तकं...
२३ एप्रिल - आज जागतिक पुस्तक दिन. असा काही दिन असतो हे आजच मला कळलंय! मदर्स डे, फादर्स डे, वूमन्स डे, व्ह्यालेंटाइन डे ह्यांच्या इतकं ग्ल्यामर आजच्या डे ला नाही. पण ह्या दिवसाच्या निमित्ताने मी आजपर्यंत काय काय वाचलं ह्याचा सहज विचार केला तर मी अद्यापही एकदमच छटाक वाचक आहे ह्याची जाणीव झाली. माझ्या वाचनाची - ज्याला आपण अवांतर म्हणतो ते वाचन, सुरुवात कधी झाली हे सांगणे तसे अवघड आहे. पंधराव्या वर्षापर्यंत तरी मी चांदोबा, विक्रम वेताळ, गृहशोभिका(होय! हे मी वाचायचो) आणि सोळाव्या सतराव्या वर्षी मी मा.म. देशमुख ह्यांची काही छोटी छोटी सनसनाटी पुस्तके वाचायचो. ही पुस्तके सनसनाटी आहेत हे मला तेव्हा कळायचे नाही. तरी गृहशोभिकाच मी जास्त वाचायचो. नववी दहावीला असताना मधल्या सुट्टीत जबर 'दूरदृष्टि' असणा-या काही महान मित्रांच्या उपकाराने मी हैदोस, डेबोनियर, प्यासी चुड़ैल, मदमस्त जवानी ही पुस्तकं पण चवीनं वाचली आहेत. इंजिनियरिंगला आल्यावर हैदोस च्या पुढच्या आवृत्त्या हॉस्टेलात ढिगाने पडलेल्या असायच्या. एकदोनदा त्याचे सामूहिक वाचनाचे कार्यक्रम हॉस्टेलात झालेले. पुढे पुढे तेही बोर झाले. हैदोस वाचण्यापेक्षा कॉम्प्यूटरवर हैदोस पाहण्याकड़े कल वाढला. अभ्यासाची पुस्तके अज्याबात झाटभर सुद्धा डोक्यात शिरत नसल्याने रिकामचोट वेळ कसा घालवायचा म्हणून भिकारचोट दिवस ढकलत असताना एका थोर कवी मित्राने मृत्युंजय, स्वामी वाचायचा सल्ला दिला. ही पुस्तके वाचून मी येडाच झालो. त्यातल्या उता-यांचे पारायनं करू लागलो. त्यातल्या भाषेने रिकाम्या मेंदुचा भयंकर ताबा घेतला. उठता बसता हागता मूतता पादता मी अलंकारिक भाषा बोलाय लागलो. छातीला वक्ष म्हणाय लागलो. ढुंगनाला नितंब म्हणाय लागलो. तोंड धुवायला जाताना मुखप्रक्षालन म्हणाय लागलो. चिलटांना चांदण्या म्हणाय लागलो. एकूणच मी कविमित्राच्या साथीने प्रचंड गंडलो. पेशवाई बद्दल मला लैच प्रेम दाटून यीवू लागले. महाभारत मला ग्रेट वाटू लागले. एकेकाळी अफगानिस्तान पासून इंडोनेशिया पर्यंत आपला भारत पसरला होता ह्याचा विचार करकरून दू:खी होऊ लागलो. संडासात बसल्या बसल्या अर्जुनाचा कर्णाच्या धनुर्विदयेचा विचार करू लागलो. वाचनाची खाज अत्युच्च पातळीवर पोचलेली असतानाच्या त्या दिवसात मी पुल, वपु, पाडगावकर, डयान ब्राऊन तड़ातड़ वाचून काढले. पण महाभारत आणि पेशवाईचा प्रभाव कायकेल्या कमी होईना. कॉलेजच्या म्याग्झिनमध्ये खत्राड अलंकारिक भाषेत एकदोन प्रेमकथा कविता लिहिल्या आणि ज़रा फेमस झालो. ज्युनियर लोकांच्या कविता लेख माझ्याकडे चेकिंग ला यीवू लागले. कवी मित्राच्या साथीने कवितेत करेक्शन्स सुचवून हवा करू लागलो. मी लै डेंजर वाचक अन लेखक है असे समजू लागलो. म्हणजे मित्रही तसेच समजू लागले...
कधी कुठून नेमके आठवत नाही आता, पण एके दिवशी "तुही इयत्ता कंची" हे पुस्तक हातात पडले. नामदेव ढसाळ हे नाव आयुष्यात पहिल्यांदाच ऐकले. "आठवणीतल्या कविता", "श्रावनधारा", "रेशीमगाठी" वगैरे अश्या थाटात कवितासंग्रहाची नावं असतात ह्या समजुतीला हा पहिला धक्का बसला. कविता वाचायला लागलो. सुरुवातीला एक अक्षर मला घण्टा कळेना. जसजश्या ढसाळांच्या कविता वाचत गेलो तसतसा मी मुळातून हादरून गेलो. ही भाषा, ही माणसं, ह्यातलं विश्व हे सर्वच्या सर्व प्रचंड अक्राळविक्राळ रूप धारण करून मला अस्वस्थ करायला लागलं. माझ्या थंडगार अभिव्यक्तीच्या बुडाखाली कुणीतरी भयानक तिखटजाळ भड़का उडवला होता. माझ्यावरची मध्यमवर्गीय आवरणं उचकटायला सुरुवात झाली. ह्या कवितांमधली ओळ अन ओळ मला समजत होती असे नाही; आजही कित्येक समजत नाही; पण प्रत्येक कवितेनीशी अंगावरचं सालटं निघतंय, मध्यमवर्गीय ब्लड पंपना-या माझ्या काळजात कुणीतरी दगड भोसकतंय अश्या जाणिवा गडद होत गेल्या. मी नुसता जमिनीवर आलो नाही तर जमिनीत गाड़लो गेलो. एकामागोमाग एक लिंक जुळवत गेलो. ढसाळ, चित्रे, कोल्हटकर, तेंडुलकर, सुर्वे जमेल तसे वाचत गेलो. आजही वाचतोच आहे. इथल्या वास्तवाची जाणिव ठळक करणारी ह्यांची विस्तवासारखी पुस्तकं माझ्या अभिरुचीला अत्यंत वेगळे वळण देऊन गेली. मी पारंपारिक वाचक तुपाळ होण्या पासून बचावलो. माझे काही मित्र निखिल पुजारी, अमित शिंदे, पांडुरंग चोरमले ह्यांच्यामुळे वाचनकक्षा अजूनच रुंदावल्या. केवळ साहित्यिक पुस्तकं न वाचता ह्या वादविवादपटाईत मित्रांमुळे वैचारिक, सामाजिक पुस्तकं वाचावी लागली. ह्या इथे फेसबुकवर ज़रा एक्टिव झाल्यापासून तर आपण किस झाड़ की पत्ती हे कळलं. फेसबुकवर इथे भन्नाट अप्रतिम लिहिलं जातं, वाचलं जातं. कित्येक नवी पुस्तकं, लेखक फेसबुकमुळे माहीत झाले. इथल्या लोकांच्या मानाने मी एक अत्यंत साधारण वाचक आहे. पण हळूहळू कक्षा रुंदावत आहेत. बरंच काही वाचायचंय हे समजलंय. लेखक बिखक व्ह्यायची माझी औकात आहे की नाही माहीत नाय, पण सर्वांगीण वाचक होण्यासाठी मी नेहमीच धड़पडत आलोय. धकाधकीच्या आयुष्यात केवळ फेसबुकवरचे आणि बाहेरचे दोस्त आणि पुस्तकं ह्यांच्यामुळेच मी तग धरून आहे!
Comments