स्ट्रॉबेरी

जहाल लालभडक मिरची रंगाची लिपस्टिक लावून, आयलायनर, मस्करा, फॉउंडेशनचा मेट्रोमास्क धारण करुन, बारीक पट्टीचा ओपन ब्याक स्लीवलेस घालून गोरया नितळ स्लिम दंडावरचा चिकना ट्याटू मिरवत कोमट कोडगी म्याड़म पीव्वर हॉट झाली. फिगर उठून भेदक दिसावी म्हणून सिल्कची साडी सगळ्या कर्व्हज वरुन अजून चोपुन चापुन व्यवस्थित केली. नाऊ इट्स लुकिंग प्योर हॉट या! हाय हिल्स घालता घालता मुद्दाम ज्यास्त वाकून तिने सोफ्यावर रेळलेल्या यंग डायन्यामिक हब्बीला झापले "ह्या अश्या चिप अवतारात येणारेस तू? तुला कळतंय का हन्नी व्हेर आर वि गोइंग? ती परवाची कॉस्टली शॉपिंग काय उगाच केलीय का?श्शी गावठी तो गावठीच." तिच्या रिकाम्या खोल गळ्यावरच्या कातील तिळाकड़े निरखून बघत वैतागत हब्बी आत गेला. क्रेडिट कार्डावर घेतलेला शॉपर्स स्टॉप मधला टी शर्ट आणि जीन्स घातली. बायसेप्स दिसाव्यात म्हणून टीशर्टच्या बाह्या ज़रा वर ताणल्या. एक्स डिओ मारून झटपट रेड़ी झाला. "हम्म. आता ओकेय. बट स्टील नॉट लाइक सलमान हां". "यू टू नॉट लाइक ऐश हां." एकमेकांची खेचत दोघे सोसायटीच्या खाली आले. इन्नोवा रेडिच होती. "घराला घरपन देणारी मानसं...खिशाला टर्रकन् फाड़नारि मानसं". सुपरवायझरने म्याड़म च्या खोल गळयाकडे पाहत "हेल्लो म्याम् हाउ आर यु. हेल्लो सर" केले. तिघे गाडीत बसले. गाडी साइटच्या दिशेने निघाली...

अवकाळी पावसाचे टप्पोरे थेंब पडाय लागले. म्याडम ने काच ज़रा खाली घेतली. खुश रोम्यांटिक झाली. सुपरवायझरने आयप्याड वर टिचकि मारली. सॉफ्टवेयर चालु केले. म्याडम पाऊस एन्जॉय करत कधी आभाळात कधी आयप्याड बघू लागली. हब्बी आयप्याड वर मेगाटाउनशिप अवाक होऊन बघू लागला. इथं हॉट म्याडमचं आणि यंग डायन्यामिक हब्बीचं सगळं सगळं जग सामावलं होतं. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, इंटरन्याशनल स्कूलस, फाइव स्टार हॉटल, सेवन स्क्रीन मल्टीप्लेस, क्रिकेट ग्राउंड, बास्केटबॉल, टेनिस कोर्ट, ऐम्फिथेटर, सेंट्रलाइझड़ क्लाइमेट कंट्रोल्ड एसी क्लबहाऊस, पाच हजार स्क्वेयर फुटाच्या तीन जिम्स - वन कॉमन, वन फॉर एक्सक्लूजिव योगा, एंड वन स्पेशल एक्सक्लूजिव फॉर हॉट ऑर वन्ना बी हॉट म्याडम्ससाठी.

गाडी आयप्याड मधल्या एक्चुअल साइटवर पोचली. जीपीयसने कनेक्टेड असना-या सॉफ्टवेयर मध्ये वेलकम मेसेज झळकला. माणसांना जोडणारी घरं... घराला घरपन देणारी मानसं... प्रचंड विस्तीर्ण, नजरेत न मावना-या अवाढव्य माळावरच्या वीसबाविस मजली बिल्डिंग्ज. काही रेड़ी तर काही फायनल टचअप साठी आसुसलेल्या. काही नुकत्याच माळाच्या पोटातून वर उठना-या. पावसाच्या भुरभुर धांदलीत म्याडम डब्बल हॉट झाली. यंग डायन्यामिक हब्बी बजेटचा विचार करत ज़रा नर्व्हस झाला. तिघे क्लाइमेट कंट्रोल्ड ऑफिसच्या केबिन मध्ये आले. कॉफीचे घुटके घेत घेत सुपरवायझर ने साइट प्लान सविस्तर "इल्याबोरेट" केला. कमीत कमी बाराशे चौरस फुटाचे फल्याट. बेसिक ओन्ली नायन्टी ल्याक्स. चौथ्याच्या वर फ्लोअर राइझ एक्स्ट्रा. गार्डन फेसिंग एक्स्ट्रा. पोडियम पार्किंग एक्सट्रा. सुपरवायझर ने साईट फिरुन रेड़ी/सेमि रेड़ी फ्ल्याट्स बघुयात म्हटले.

हॉट म्याडम लाल गुलाबी होत गेली. ढगाळ वातावरणात हब्बी आता काळवंडत गेला. अस्वस्थ होत गेला. बजेटची गणितं जुळवू लागला. डाउन पेमेंट वीस की पंचवीस लाख? त्यात गावाकडच्या बबन्याने नुकतेच कालपरवा खजील होऊन मागितलेले दोन अडीच लाख. हॉट म्याडमला खुलवलेल्या अवकाळी पावसाच्या गारपिटीने बबन्याची कित्येक एकरभर स्ट्रॉबेरी उध्वस्त झालेली. कुठकुठली देनी चुकती करायची होती. चांगल्या दिवसात स्ट्रॉबेरीचे बॉक्स च्या बॉक्स सरप्राइझ फुकट पाठवनारा बबन्या. यंग डायन्यामिक हब्बी च्या आंतर्जातीय विवाहासाठी जीव तोडून कट्टर बापासोबत मध्यस्थी करणारा बबन्या. खंगलेल्या बापाची धुगधुगी संपायच्या आत वंशाची पणती/दिवा यीवु दया म्हणून अधेमधे फ़ोर्स करणारा गांडदोस्त बबन्या. फिगर काय नंतर पण यील की असा चुत्या इच्चार करणारा बबन्या. आता देशोधडीला लागलेला बबन्या. रांगड्या आवाजाचा पण फोनवर बोलताना पहिल्यांदाच इतका कासाविस घुसमटलेला सारखा सारखा रेंजबाहेर जाणारा बबन्या. आत्ता कायबी करून लाखभर तरी दे याजासकट दोनतिन महिन्यात परत करतो म्हणत आवाज खोलखोल डोहात गेलेला बबन्या. समोर असता तर पायच धरले असते इतका खचलेला गांडदोस्त बबन्या. गारपिटिने गारठलेला उबदार काळजाचा बबन्या. छ्या! कसं एडजस्ट होणारेय?

म्याडमचा हॉटनेस काय दहाव्या मजल्याच्या खाली यायला तयार नव्हता. सुपरवायझर ऊँचे लोग ऊँची पसंद म्हणत राह्यला. एक फ्ल्याट हब्बी ला बरा बजेटेड वाटला. पण बाल्कनीतून JNNURM च्या पुनर्वसनाच्या उदास भोसडलेल्या इमारती दिसल्या. म्याडम "श्शि डिसगस्टिंग" म्हणत गार्डन व्ह्यूच हवाय म्हणाली. एक कोटि जातायतच तर वर खाली पाच सहा लाख काय फरक पडतो म्हणाली. गार्डन व्ह्यू च्या बाल्कनीतून हब्बी गरागराय लागला. ओहोहोहोहो वॉव वॉव व्हाट अ व्ह्यु क्लास्स्स... सुपरवायझर "आजच दोन लाख पोस्टडेटेड चेक टोकन देऊन इनिशियली बुक तरी करा" म्हणाला. फ्रॉम टुमारो रेट्स माइट चेंज. ऑल्सो इफ यु बुक टुडे डाउनपेमेंट झाल्यावर आयप्याड कॉम्पलीमेंट्री मिळेल. म्याडम वॉव ग्रेट म्हणाली. आजच बुक करुयात म्हणाली. येस येस म्हणत सुपरवायझर ने दुजोरा दिला. शिवाय आज अक्षयतृतीया म्हणजे परफेक्ट मुहूर्त म्हणाला. यंग डायन्यामिक हब्बी ढासळला. चेक बुक काढत शरणागती झाला. टू ल्याक्स ओन्ली लिहिताना बबन्याचा फोन आला. फोन व्ह्यायब्रेशन वर टाकला. चेक सही करून अकाउंट पेई करताना परत फोन आला. फोन म्यूट वरच टाकला. फ्ल्याट बुक झाला. बाराशे स्क्वेयर फुटाने कित्येक उध्वस्त एकरांवर मात केली. गार्डन व्ह्यू ने बबन्याच्या सडलेल्या स्ट्रॉबेरीजला झिड़कारले. अवकाळी पावसाच्या महानगरी धुंदीने गारपिटित सापडलेल्या येडझव्या ग्रामीण क्षुद्र बबन्याला हाड हाड केले. कोल्ड ब्लडेड हॉट म्याड़मच्या अदाकारीने बबन्याच्या ओरबाडलेल्या चेह-यावर मात केली.

सुपरहॉट म्याडम आणि हब्बी घरी आले. म्याडमने झटपट फेसबुकला "व्हाट अ ग्रेट डे टुडे, सच अ लवली क्लाइमेट एन्ड बुक्ड ए ग्रैण्ड 1200 sqft गार्डन व्ह्यू फ्ल्याट" स्टेटस टाकले. लाइक्स आणि कमेंट्स चा भडिमार सुरु झाला. म्याडम चेकाळली. करकचुन हब्बीला जहाल किस दिला. "आय लव यु सो मच. उम्म्म्म. लेटस ह्याव अ स्ट्रॉबेरी!" लाजून म्हणाली. मदहोश झाली. येडझव्या बबन्याचा परत फोन आला. आता फोन फ्लाइट मोड़ वर टाकून नुसता वायफाय ला कनेक्ट केला. शेकड़ो नोटिफिकेशंस येत राह्यले परंतू येडझवा बबन्या मात्र कायमचा रेंज बाहेर गेला. स्ट्रॉबेरी फ्लेवर कोंडोमचं पाकिट कुठं ठेवलंय ह्याचा विचार करत कोडगी हॉट म्याडम आणि कोडगा यंग डायन्यामिक हब्बी बेडरूम च्या दिशेने मेट्रोस्टायल फोरप्ले करत रवाना झाले.

Comments

३-४ महिन्यापूर्वी तुमचा ब्लॉग वाचनात आला. फटकळ, स्पष्ट, बिनधास्त पण सध्याच्या दुटप्पीपणाबद्दल सत्य लिहिता तुम्ही!
Unknown said…
Great ज्वलंत Post... मयुरदा.
_/\_
Unknown said…
मयूर भौ या लिखाणाला तोड नाही ..

Popular posts from this blog

नामदेव ढसाळ : विद्रोहाचे भाषेचे करुणेचे मूर्तीमंत प्रतिरूप!

भाकरी, पूरणपोळी आणि पिझ्झा!