मित्र आणि साहेब.
आमचा एक साहेब मित्र होता. म्हणजे आधी मित्र होता नंतर साहेब झाला. आता साहेब आहे पण मित्र नाही. त्याला मित्र समजण्यात माझी कसलीच सोय नव्हती. सोय आणि मैत्री एकत्र नांदू शकत नाहीत. बरं माझी न त्याची ब्र्यांचपण वेगवेगळी असल्यानं एकत्र बसून अभ्यासानं फाटलेल्या एकमेक्काच्या टी-या शिवायचा उसवायचा पण काही संबंध नव्हता. ह्याचा येकमेव आधार म्हणजे सिओईपी हॉस्टेलाच्या उंचच उंच भिंतीवरुन रात्री दोनतिनला उड्या टाकून, शिवाजीनगरच्या ष्टयान्डवर चहा क्रीमरोल पोहे आन गप्पा मारायला जाताना हा सगळ्या दोस्तांना पलिकडं उतरायला मदत करायचा. स्वत: नव्वद किलोचा सांड असल्यानं त्याच्या पाशवी ढुंगनाला टिरीखालून जोर देवून त्याला आधी वर चढ़वनं लै मुश्किल काम. शिवाय हा कधी ठस्सदिशी पादेल ह्याचा काय भरोसा नाही. मग मित्र आमच्या टी-यांना जोर देवून सगळ्यांना वर चढवून नंतर सर्वात शेवटी खाली उतरायचा. हे म्हणजे गांडदोस्त असल्याचं फिलिंगच जणू. मग आम्ही ष्टयांडवरच्या उपहारगृहात मुतु येस्तोवर पपा-या मारायला चालू. आरक्षण, गांधी, वोल्गा ते गंगा, बांग्लादेशी दलित मुस्लिम हिंदू, आरएसएस, बिपाशा मल्लिका सोनया, हेडगेवार ह्यारी पॉटर कांदा लसून शरद पवार. मित्र म्हणायचा "ह्ये बघ लंक्या, पुजा-या, अम्या कसं अस्तंय माहितेका सगळ 'सम्यक' दृष्टीने बघता यायला पायजेल. पोहे सांगू का रं आणिक दोन प्लेट?" पुजारी आणि मी पण "होय होय सम्यक सम्यक" म्हणत चहा पोहे रिपीट. "भाड़खाऊ ठसठस पादतंय तरी हादडतंय" अश्या नजरेनं अम्या त्याच्याकडं बघायचा. अम्या पुढे कॉमरेड झाला. सम्यक सम्यक म्हणत साताठ प्लेट पोहे आन दहा बारां क्रीम रोल. सगळेच अशक्य पादाय लागल्यावरच बिल ऑर्डर. बिल येस्तोवर ह्येचा टॉपिक सम्यकवरून विपश्यनेवर आलेला. येकदा आपण सगळेच मिळून इगतपुरीला जायला पायजेल असं म्हणत रिकामं पाकिट काउंटरवर उघडून दाखवायचा. ह्याचे पैसे कुणीतरी भरायचो. मग हॉस्टेलवर रिटर्न.
कॉलेज संपलं. पूजा-यानं अरबी समुद्र वलांडला. अम्या न मी पुण्यातच जॉब जॉब म्हणत राह्यलो. मित्र म्हनायचा "यूपीयस्सी करणार". मी म्हनायचो "तूच हैस गडया जिगरबाज". मित्र - "आयेयस होऊन तळागाळात जाऊन कामं करणार." मी - "तू व्हरे पुढं मर्दा." मित्र - "तुमचा सपोर्ट लागंन मला. लै जनरल नोलेजचं काम अस्तंय." मी - "अरे हैना आपन इथंच. तू लढ रं भावड्या." मित्र - "यशदात जावं लागेल. दिल्लीला पण जावं लागतंय. आता फाउंटन बारला जाऊन चिकनहांड़ी हानू. टिटियमम?" मी - "आरं चलना भाऊ. एकदोन कविता पण ऐक्वायच्यात तुला." मित्र म्हणायचा "दिल्लीला जानं म्हणजे दोनेक लाख तरी कमित्कमि पायजेलच. अर्र पैसे काढलंच नाही एटीएम मधनं". मी -"थांब. किती झालंय? भरतो मीच बिल." गडी टिटियमम ला टीटीयमटी करायचा. माझं कार्ड स्वाइप होस्तोवर संविधानाचं प्रीएम्बल सांगायचा. 'वी द पीपल ऑफ़ इंडिया म्हणत' मित्र स्वताच्या पैशानं मसाला पान तरी खाऊ घालायचाच. अम्या कधी सोबत असायचा कधी नाही. मी मात्र जबर रेग्गुलर गड़ी. मित्राचा कधी माझ्या रुमवर महिनोन्महिने फुकट मुक्काम. कधी गायब. कधी माझ्या बाइकवरून एबीसी पालथा घालनार ह्याच्या पुस्तकांसाठी. अधेमधे फाउंटन बार, कावेरी, कमित्कमि मॉडर्न क्याफे. तू लढ रं मर्दा म्हणून ह्येच्यापेक्षा जास्त मीच ह्येच्या लढाईत पुढं. असं वर्षभर झाल्यावर मित्र म्हणला "भायलोग. मी जातो बरका दिल्लीला. तुम्हाला मिस करंन. पण जावंच लागतंय. तुमचा सपोर्ट राहु दे. अरे ब्यालन्स संपलाय लंकया. रिचार्ज करतो का?" मी - "राजे! व्हा ओ तुमी पुढं. दिल्लीला कूच करा. म्हाराष्ट्र सांभाळतो आम्ही. रिचार्ज पण करतो".
मित्र दिल्लीला गेला. हळूहळू औकात दाखवत संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेला. मग एके दिवशी मित्राच्या मित्राच्या आयेयस होऊ पाहना-या मित्राकडून समजलं की मित्र यूपीयस्सी पास झाला. आयेयस नाय झाला. पण शेवटून पन्नासेक नंबरला आला. अहाहा. गड़ी पास झाला म्हणून मलाच कंड आला आन मीच आयघातली त्येला फोन केला. "काय राजे! दिल्ली पादाक्रांत केली की गड़या! आता पार्टी फाउंटन ला!!" मित्र - "हेल्लो!हेल्लो! हूज नंबर इज धिस? मे आयनों हूज स्पीकिंग? हेल्लो हेल्लो! ओह लंकया! तुझा नंबर नव्हता माझ्याकडं. या म्यान. आय डन इट. चल नंतर बोलतो. सिया इन पुणे बाय!" फोन कट. मित्र 'साहेब' झाला. नंतर पाचसहा वेळा फोन करूनसुद्धा साहेब काय फोन उचलेनात. साहेब 'मित्र' राह्यला नाही. आठेक महिन्यांनी साहेबाचाच फोन आला. "आय्यम एट सेंच्युरियन हॉटेल फॉर ट्रेनिंग. लिविंग टू दिल्ली बाय टूनाइट. यु क्यान मीट मी एट हॉटेल ऑर एट एयरपोर्ट, व्हाट्से." मी काय आता पूर्वीइतका येडझवा राह्यलो नव्हतो. गांडदोस्तीच्या गोष्टीतले चांदोबे कॉलेजातच मावळतात हे समजून चुकलो होतो.. "व्हूज नंबर इज धिस? तुझा नंबर नव्हता रं माझ्याकडं. एनीवे सॉरी यार तुला भेटायला मला वेळ नाही भाई! सरकारी मानसांइतका वेळ नसतो प्रायवेट सेक्टर वाल्यांकडं. तुमचा पगार आमच्या ट्याक्स मधनं येतो. यायचंय तर तूच ये हिंजवड़ी फेज दोनला." एक वर्षांनी साहेबाचा फेसबुकवर मेसेज आला. लग्न ठरलंय म्हणला. तुला यावंच लागेल म्हणला नाचायला. साहेब बिझी मानूसघाना झाला. अम्याचा फोन आला. म्हणला जाऊ लग्नाला. ह्यां साहेबांना अशीपण गर्दीची गरज असते. आपलं पण भेटनं होईल. लग्नाला गेलो. तुफ्फ़ान गर्दी. हॉलच्या दारात थुई थुई कारंज्यात भिजनारा संगमरवरि लाइफसाइझ बुद्ध. ढोल ताशे ब्याण्ड बाजा. घोड़ा घोड़ी. रेड कार्पेट. ग्र्यान्ड कारभार. मला दीवाने ख़ास आन दीवाने आम दरबाराचं फिलिंग येऊ लागलं. हत्तीच तेवढ़ा बाकी ठेवला होता नाचवायचा. अरारा नाक्क्मुक्का नाक्क्मुक्का म्हणत गर्दी थिरकत होती. काळा गॉगल लावलेला साहेब इंद्ररथातून गर्दीला हात करत होता. मिरवनूक झाली. बुद्धवंदना झाली. फाइवस्टार लग्न पार पडलं. म्हटलं आता ह्याला भेटून जावं. तर भेटायला काळ्या कोटवाल्यांची गुघान गर्दी. सगळे आयेयस, आयपियस, आयआरयस आधी. नंतर साहेबांच्या ऑफिसातले कर्मचारी. नतंर आम्ही जुने दोस्त(?). प्रायोरिटी क्यू मध्ये सगळ्यात खाली. सगळ्यात शेवटी गावाकडचे "तळागाळातले लोक". अम्या म्हणाला "सम्यक. इथल्या इथं चार वर्ग तयार झालेत बघ. आज बुद्ध केवळ हसला नाही. तर तो हसून खदाखदा लोळतोय." बुद्धाच्या स्टेच्यूला प्रणाम केला. मित्राचे साहेबीकरणाचा अवतार अनुभवून आम्ही परत निघालो. ऑन द वे अस्तानाच तुझी माझी यारी भोक्कात गेला तू आन तुझ्यासकट दुनियादारी म्हणत साहेबांना फेसबूकवरून आणि मनातून कायमचे अन्फ्रेंड केले...
Comments