Posts

Showing posts from July, 2007

प्रांतवाद कि राष्ट्रवाद

प्रतिभाताईंच्या उमेदवारीने मराठी माणसापुढे नवीन प्रश्न उभे केले आहेत. प्रांतवाद कि राष्ट्रवाद अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. मराठ्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याप्रतीच्या भावना आणि योगदान ह्यांनी इतिहासाची पाने पराक्रम, त्याग, बलिदान आणि विजयाने झळाळून टाकली आहेत. सम्राट शालिवाहनाने शक, हूण आणि कुशाणांना पराभूत करून ह्या भूमीला रानटी आक्रमकांपासून मुक्त केले. त्रिसमुद्रतोयपितवाहन ही पदवी सातवाहन राजांनी सिद्ध केली. छत्रपति शिवाजी महाराजांनी मोगलांना पाणी पाजून पराक्रमाची परिसीमा केली आणि राष्ट्रीय स्वाभिमानाची पुनर्स्थापना केली. येथील समाजसुधारकांनी देशाला प्रगतीची नवी दिशा दाखवली. असे असताना एक मराठी माणूस देशाच्या सर्वोच्चपदी बसण्याचा आनन्द मराठी लोकान्ना व्हावा आणि त्यान्नी त्यासाठी प्रयत्न करावा ह्यात गैर असे कहीही नाही. हा काही प्रान्तवाद नाही. प्रान्तवाद तो, जो त्या प्रान्तातील लोकान्ना मूळ राष्ट्रीय प्रवाहापासुन दूर नेण्याचा प्रयत्न करतो, फुटीरतेची आणि वेगळेपणाची भाषा करतो. अशा प्रव्रुत्तीला क्रूरपणे आणि निर्घ्रुणपणे ठेचले पाहीजे. ह्या निमित्ताने मराठी कोण हा प्रश्न ही उभा राहीला आहे.

आज्जी...

आज्जी... मी काय लिहू तुझ्याबद्दल? मी कसं काय आवरू माझं सडलेलं समकालीनत्व? मी रमू कोणत्या भूतकाळाच्या पिंपळफांदीवर जेव्हा जमलाय माझ्या घरादारावर बोन्सायछाप सावल्यांचा व्यवहारी गोतावळा? आज्जी... कशी कशी वाचू मी तुझ्या हयातभर विखुरलेली सुरकुत्यांची लिपी? आज्जी... मी काय लिहू तुझ्याबद्दल? तुझ्या स्त्री-तत्वावर इतक्याजणांनी पांढर्‍याचं काळं केलं... मी कुठून शोधून आणू कोरडावलेल्या पिढ्यांना शेवटपर्यंत मायेनं पोसणारे तुझ्या गर्भातले नैसर्गिक चिवट रंग? आज्जी... माझ्या अंगावर शिंतोडली जाणारी ही डिजीटल असाह्यता... मी कसे काय रेखाटू तुझ्या मातीचे चित्र? जात्यावर भरडलेल्या तुझ्या व्यथांचे गात्र? आज्जी... ह्या अपरिहार्य वर्तमानी श्वासांची कात टाकून कसा काय पांघरू मी माझ्या घराच्या कोनाड्यातून ठिबकणारा तुझा एकाकी वास? लिहून लिहून किती काय लिहू मी तुझ्याबद्दल आज्जे? माझ्या पांढरपेशी फुफ्फुसाला वर्ज्य ठरवला गेलेला तुझ्यातल्या जन्मदत्त करूणेचा घनघोर महारकालवा... कसे काय घोंघावेल तुझ्या माणूसपणाचे महाकाव्य पुसटसेही माझ्या नसानसांच्या गल्लीबोळातून?? हा माझ्या कानात गुंजतोय कसला हायटेक कल्लोळ? ही माझ्या प