मी दावा करत नाही असा की...

मी दावा करत नाही असा की
सगळेच्या सगळे प्रश्न सुटतील
शब्दांच्या एका फटका-यानिशी...
किंवा नेहमीच माझ्यापाशी असलेल्या
शाईतून उचंबळून प्रसवतील
सगळीच्या सगळी असलेल्या नसलेल्या
प्रश्नांची सगळीच उत्तरं...

मी प्रश्नांची माळ ओवण्यासाठी
लिहित नाही कविता फावल्या वेळातल्या
एखाद्या बेकार छंदासाठी...
किंवा माझी कविता मागेही लागत नाही उत्तरांच्या
हात धुवून चार घासांची ढेकर दिल्याशिवाय.

पण, लपतछपत का होईना;
माझी कविता कुरतडू पाहते माझ्यावरच्या
सतराशेसाठ मध्यमवर्गीय अवस्थांचे आवरण
आणि पांघरून देते मला एखाद्या चिलखतासारखी -
जिथं मी अनुभवू शकतो
आईच्या गर्भातली माझ्या हक्काची उब...
निर्भय ,निरंतर आणि निष्पाप!

Comments

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही