बोन्साय - 2

बोन्साय ला काल जवळजवळ आगच लागली. जंगलात वणवा लागतो. इथं फक्त चरचराट झाला नुसता.हल्ली फार काम नाही कंपनीत. पगार अजून तरी चालूच आहे हीच काय तेवढी समाधानाची बाब. अश्या दिवसात बोन्साय फारच बहरतात. नको तितके. बोन्सायचीही पानगळ होतेच कधातरी. पण पानंच सगळीच्या सगळी प्लॅस्टिकची लावली असल्यावर कसली आलीय डोंबलाची पानगळ? अश्या प्लॅस्टिकला वास नसतो. फक्त रंग असतो. विकत घेतलेल्या स्प्रेचे दोन चार फवारे..तेवढाच काय तो वास. बाकीचं सगळं काही गंधहीन. प्रतिष्ठेच्या रंगात डुचमळलेलं... इथं कसल्याच गोष्टीत नैसर्गिकता नाही. सगळं कसं ओढून ताणून फिट्ट बसवल्यासारखं वाटतं. कंटाळा येतो अश्या अवस्थेचा. मी फार फार तर दोन दिवस जपून पाहतो अश्या सगळ्या गोष्टी. हा हॅंगओव्हरचा वारसा बापजाद्यांपासून चालत आलेला. मी म्हटलं झालं ते खूप झालं. च्यायला! किती दिवस मी तरी गोड न राहिलेल्या सारखेची, खारट न राहिलेल्या मिठाची, तिखट न राहिलेल्या चटणीची तीच तीच तीच तीच शिळी रेसिपि आचेवर धुमसत ठेवू? काही दिवसांपूर्वी मीच स्वतः लिहिलं होतं की हल्ली स्वतःच्या आयुष्याविषयी तिरस्कृत लिहिण्याची फॅशनच झाली आहे. आज पुन्हा तेच. पण मी तरी काय करू? अस्सल तिरस्कार आणि मारून मुटकून कण्हून आणलेला तिरस्कार ह्यांच्यात कसा फरक करणार?मुळात मनुष्यात तिरस्काराची बीजे कशी रोवली जातात हे फारच इंटरेस्टींग असतं. म्हणजे असं होतं - तुम्ही स्वप्नं बघता मोठी मोठी एखाद्या फ्रायडे नाईटला. आणि मन्डे मॉर्निंग येता येता जमिनीवर येता.पुढचे दिवस पाय कधी मातीवर, कधी मातीखाली, कधी थोबाड फुटेल हे माहीत असतानाही हवेत गडबडतात. 'असं आपण किती दिवस जगू शकतो?' हा प्रश्न विचारत असतोच आपण स्वतःला. पण फेअर ऍन्ड लवली लावून गो-या झालेल्या कावळ्यासारखा रूबाब घेऊन वावरणारे आपण... दिवसादोन दिवसांत मेक-अप उतरतोच की!!!
आयुष्य = करिअर(माणसाला इतर उपयोगी काहीच कामधंदा नसताना केलेला खटाटोप) +
कुटूंब (2 बीएचके साठी सुटेबल असणारं) +
अप्रेझल्स (ची वाट पाहत राहणं) +
इन्शुरन्स (उद्याच्या शर्यतीत टिकून राहावं म्हणून आजच् कुबड्यांची व्यवस्था करणं) +
लोडशेडिंग (आमच्याकडे इनव्हर्टर आहे हे सांगण्यासाठीचे प्रतिष्ठीत कारण) +
कधीमधी भरून येणार गळा(हॉटेलात पोटभर जेवून पान खाल्ल्यावर येणारा माज)
रस्त्यावरच्या
दारिद्र्यासाठी +
चारदोन शिव्या सिस्टीमच्या नावाने
(आजूबाजूला चोर,पोलीस, गुंड कोणी नसताना दिलेल्या) +
बरंच काही...बरंच काही...
हे म्हणजे आयुष्य?? की अजून दुसरं काय? बोन्साय बहरतात म्हटलं हे चुकलंच!!
बोन्साय बहरत नसतात कधीच. बोन्साय वारसाहक्काची निशानी असतात. पिढीदर पिढी पानं उगवतात आणि गळवतात. एकूण पानांची संख्या नेहमी जवळपास सारखीच!
तिरस्कार आयुष्याविषयी नाही. ज्याला आपण आयुष्य समजून स्वतःची नसलेली इभ्रत परंपरेच्या लॉकरमध्ये ठेवून देतो...तिरस्कार ह्याचा वाटतो!

Comments

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही