दार
नाही वाटंत असं आजकाल की
घटनांच्या काळ्यापांढर्या कागदावर
उमटवून द्यायलाच हवेत शब्दांचे
शतरंगी शिक्के...
'आहे हे असं आहे' असंच मानून चालायचं
तर मग बसतीलच कसे
अपेक्षाभंगाचे अनपेक्षित धक्के?
कोसळलेल्या भिंतींमधलं...
म्हणजे कसं होईल की
'नसलेल्या घरात अमुक अमुक दिशेनेच
पाऊल टाकायला हवं' ह्या परंपरेतून
सुटका होईल नसलेल्या घरात येणार्यांची
आणि नसलेल्या घरातून बाहेर जाणार्यांची...
तरीही तोपर्यंत मोक्ष मिळाल्याचा दावा करू नये आपण
जोपर्यंत कोणी बांधत नाही दाराला
एखाद्या कवितेचं तोरण!
Comments