काँग्रेस ची संवैधानिक बांधिलकी!

शहाबानो प्रकरणात ढीगभर माती खाण्याचा इतिहास असणाऱ्या काँग्रेस ने ओवेसी ची संवैधानिक बांधिलकी मोजण्याचा अट्टाहास करणे हे मोदीने 'नेहमी खरे बोलावे' असा सुविचार भर सभेत सांगण्याइतकेच ढोंगी आणि दांभिक आहे. संविधानाचा मान सन्मान आणि अभ्यास असणारा बॅरिस्टर ओवेसी इतका दुसरा कुणी क्वचितच असेल ह्या देशात. आम्ही राजकारण करू तेव्हा ते एकदम पवित्र आणि तुम्ही कराल ते मात्र अनहायजेनिक असला गुत्तेबाज माज काही कामाचा नाही. तो समूळ नष्ट झाला पाहिजे. तशीही काँग्रेस ची मजल एखाद दुसरी संविधान बचाव रॅली काढण्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. काँग्रेस संविधानाशी एकनिष्ठ राहिली असती तर देशात मोदी जन्माला आला नसता. पण काँग्रेसचा 'आम्हीच संविधान रक्षणकर्ते' वगैरे आविर्भाव म्हणजे एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर साहेब सुट्टीवर आहेत म्हणून जसा त्याचा फावल्या वेळात गुत्त्यावर सदोदित पडीक कंपाउंडर पेशंटला 'कशाला काळजी करता वं आप्पा, मी हाय ना. हि घ्या गोळी तीन टाइम. गोळी घशात आजार बोच्यात' असा दुर्दम्य आत्मविश्वासाची झूल पांघरून विश्वास आणि दिलासा देणारा तोतया वैदू आहे. तात्पर्य : आप्पाने आता शहाणे झाले पाहिजे. तसा तो होतोच आहे. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता सगळेच वंचित शोषित बहुजन शहाणे होऊ लागले तर आपुन कुणाला येड्यात काढायचे आणि गावच्या जत्रेचा मान कसा मिळवायचा हि काँग्रेससमोरची खरी चिंता आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. 'आमच्यावाचून काय हुईल संविधानाचं' अशी हातवारे सर्कस करण्याची आकड सोडून जरा माणसाप्रमाणे उठावे बसावे. ज्यांना आजवर तुम्ही पायाशी घुटमळवत बसवून स्वतः सोन्याच्या सोफ्यावर ऐसपैस बसून हात वर करून शाही थाटात तुकडे फेकून उपकार केल्याचा भाव सांगत, आजन्म ऋणाईत राहायची धमकी देत होतात, तो शेवटचा माणूस आता तुमच्यासमोर शड्डू ठोकून कॉलर टाईट करून सन्मानाने बसू लागलाय. तुम्हाला ते डोळ्यात खुपतंय. आधी डोळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मग संविधान वाचवायच्या आटपाट नगरातील गोष्टी कराव्यात.

Comments

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

Food and Indian culture

बाप आजकाल जास्त बोलत नाही