बाप आजकाल जास्त बोलत नाही

बाप आजकाल जास्त बोलत नाही. तो एकटक छताच्या पॉश पीओपी कड़े पाहत पॉश सोफ्यावर बसलाय... दुपारचे दोन वाजलेत... नुकताच कालपरवा तो साठ वर्षाचा रिटायर्ड पेन्शनर झालाय. एकोन्साठ पॉइंट नव्व्यानव चा होईपर्यंत काही वाटले नाही राव. पण आता साठ म्हटलं की एकदम पस्तिस वर्षे आपण व्होलसेल चूतिये बनलो, कुणी यडगांडयाने ही साठ ची लिमिट ठरवली, असं चिक्कार कायकाय त्याला खुपतंय, भळभळतंय, डिवचतंय, ठसठसतंय....बाप आता ना धड़ शहरी राह्यलाय ना ग्रामीण. मधल्यामधं त्याचं पॉश खेचर झालंय.  पॉश वागणं म्हणजे आपली सगळीच्या सगळी भोकं बंद करून गप्प राहाणं, पादताना सुद्धा सुरेल खोकणं...अर्थात हे तो आता कुणाशी बोलू शकत नाही. पॉश शहरात पॉश लोक्यालिटितल्या पॉश सोसायटित दहाव्या मजल्यावर पॉश फ्ल्याट मध्ये तो राहतो, तेव्हा भाषा अन वागणूक पॉशच पाहिजे असं बापाच्या सेमिपॉश बायकोने बापाला सुनावलंय...

बापाचं ह्याण्डसम पोरगं सव्विस वर्षाचं झालंय. ते कधीतरी रात्री अकरा बारा नायतर दोन तीन वाजता येणारंय क्लायंट कॉल का मीटिंग च्या नावाखाली. बापाची देखनी पोरगी बावीस वर्षाची आहे लास्ट इयर ला. ती कायतरी साडेचार वाजता घरी येऊन पाच ला एरोबिक्स ला जाऊन सात च्या शोला फ्रेंड्स सोबत नंतर बाहेरच डिनर करून येणारंय. ब्यांकेत असताना फाइल्सच्या गच्च ढिगा-यात रुतलेल्या बापाला आता रिकाम्या घरात टळटळीत शांत दुपारी डोकं तरंगल्यासारखंच वाटतंय. टप्पर वेअरचा पॉश डबा उघडण्याऐवजी आता एकटंच स्टील च्या लख्ख ताटात एकेक घास चिवडत दुपारी जेवायचं अक्षरश: जीवावर येऊ लागलंय. एकाएक आपण माणूसघाने झालो का काय अशी भीती वाटू लागलीय. घास नरड्या खाली जाईना झालाय...
बाप आता जेवून उठलाय. आत्ताशी घड्याळात सव्वातीनच वाजलेत होय. च्यामायला आपण सव्वा तास जेवत होतो हे त्याला पॉश फ्रिजातल्या पॉश बॉटल मधलं चिल्ड् पाणी पिताना कळलंय. बापाची बायको आतल्या खोलीत झोपलीय. करावं का तिला जागं? नकोच. पेन्शन फंडाचं काय करणार हा प्रश्न बापाच्या बायकोने भूताटकी मागं लागल्यागत विचारून बापाला हैरान केलंय. झोपुच द्यावं तिला. वैतागवाड़ी च्याम्मारी. सकाळपासून दोनदा वाचलेला सकाळ आता बापानं तिस-यांदा वाचायला घेतलाय....

चार वाजता दाराच्या ल्याच् ची हालचाल. दार उघडलं जातंय. इतका वेळ पेपरात घुटमळलेली बापाची नजर दाराकडे जाते न जाते तोच बापाची देखनी पोरगी हायहिल्स च्या टाकटॉक आवाजात घरात आलिय. बाप हसायच्या आत तिनं बापाकडं भुवया ताणून क्षणदोनक्षण पाहिल्यागत केलंय आणि ती झप्पकन् आत सुद्धा गेलीय. पुन्हा घरात शांततेचा बुल्डोझर डोकं चेंगरणारा....बापाची पोरगी आता परत निघालीय. ती जबरीच पॉश दिस्तेय. एका हातानं हाताच्या तळव्यापेक्षा मोठा फोन कानाला लावून दुस-या हातानं पर्स मधली लिपस्टिक बाहेर काढत ती कुणालातरि 'आरयों फकिंग किडिंग विथ मी दम लगाके या यनच टेन, लेटस सी हंटर यॉर' असं काहीतरी बोलतेय. फकिंग किडिंग हंटर यॉर म्हणजे कायतरी सीरियस पॉश भानगड़ आहे एवढंच बापाला कळतंय. फकिंग किडिंग हंटर यॉर हे नेमकं काय ते विचारायचं डेरिंग बापात अजिबात उरलेलं नाही. लिपस्टिक धरलेल्या हातानंच बापाला 'बब्बाय' करून बापाची देखणी पोरगी दार ओढून घराबाहेर गेलीसुद्धा. दाराचं ल्याच् खटाक्कन लागलंय. परत सगळं शांत... चकचकित... पॉश...


शेवटी न राहून बापानं टीवी लावलाय. झी मराठी. होणार सून मी ह्या घरची. रिपीट टेलीकास्ट. च्यानल चेंज. कुठला तरी टेली मार्केटिंग शो. कुठला तरी चायनामेड चार इंची टचस्क्रीन फोन तीनशेसाठ अंशात फिरवून दाखवतायत... बापाला एकाएकीं कायतरी खुमखुमि आलीय आणि आपला चार वर्ष जूना नोकियाचा काळा दगड घेऊन तो जागेवरून उठलाय...शांतपणे चोरपावलानी दाराकड़े चालत जाऊन बापानं दाराचं ल्याच् उघडलंय. बाहेर पॉश लॉबित येऊन दार हळूच बंद केलंय...लिफ्टचं बटन दाबून बाप समोरच्या जोशींच्या पॉश नेम्प्लेटकडे पाहत उभाय. लिफ्ट आलीय आणि लिफ्टचं दार एखादा सिल्कचा पडदा सरकावा इतक्या सहजपणे उघडलं गेलंय...आत एक भड़क पॉश पन्नाशीतलि बाई कपाळावर आठया आणून उभीय आणि सुटाबूटातला साठीतला एक माणूस कपाळावर गोट्या आणून उभाय. बाप मेन विल बी मेन्स ची जाहिरात आठवून लिफ्टच्या कोप-यात उभा राह्यलाय. कुठल्यातरी दरीत आपण फेकलो जातोय असं वाटत असतानाच लिफ्टने ग्राउंड फ्लोअर गाठलाय. ढेरी रोखलेला श्वास सोडून बाप बाहेर पडला. लिफ्ट पुन्हा वर गेलीय. सोसायटीच्या पॉश गेट मधनं बाहेर येऊन त्याने रस्ता क्रॉस केलाय आणि थेट समोर दिसना-या मोबाईल शॉपित तो घुसलाय. ह्या शॉपिचा मालक बापाच्या मूळ गावाकडचाच. बापाच्या ब्यांकेंतनच लोन घेतलेला. त्यानं हसून बापाचं स्वागत केलं. बाप म्हणालाय दाखवा टचस्क्रीन फोन. शॉपिमालक - बजेट? बाप म्हणालाय दाखव चारेक हजारापर्यंत. शॉपिमालक - ख्या ख्या ख्या. मोबाईल घ्यायला आलाय का गव्हा तांदळाचं पोतं. पुढचे विस मिनिटं शॉपिमालकानं बापाला टचस्क्रीन मोबाइलाचं गणित भूगोल इतिहास समाजशास्त्र समजावून सांगितलं...जितका स्लिम मोबाइल तीतका महाग. स्क्रीन जितकि मोठी तितका भारी. यचडी फुल्ल यचडी, पिक्सेल पर इंच, टू जी, थ्री जी, फोर्जी, वायफाय, एंड्रॉइड, विंडोज, आयोयस...बापाला सगळं अर्धवट डोक्यात शिरलंय आणि अर्धवट डोक्यावरून गेलंय...शेवटी बापांनं नऊ हजाराचा मायक्रोम्याक्स क्यान्वास निवडलाय. पाच इंची यचडी स्क्रीन. लॉलीपॉप ओयस. शॉपिमालकानं व्हाट्सयाप, फेसबुक इंस्टॉल करून बापाला जुजबि ग्यान दिलंय.  मोबाईल सिमसकट जवळपास रेडिच करून दिलाय. बापाच्या निम्ग्रामीण निमशहरि चेह-यावर आता फेयर एंड लवली ला टफ देणारा निखार चढ़लाय. बड्या खुशीत तो रस्ता ओलांडून नवा कोरा मायक्रोम्याक्स बाळ कुशीत घेतल्यागत पकडून परत सोसायटीच्या लिफ्ट पर्यंत आलाय. लिफ्टच दार उघडलंय. आत पन्नाशीतलि ती भड़क बाई वगैरे कुणीच् नाही. बाप दहाव्या फ्लोअरचं बटन दाबून निवांत वरवर चाल्लाय. मोबाईल कधी एकदा हाताळतोय ह्या विचारात असतानाच दहाव्या पॉश फ्लोरच्या लॉबीबाहेर तीच पन्नाशितलि भड़क बाई आणि तोच साठीतला माणूस जोशीच्या फ्ल्याटमधून बाहेर पडतायत. बाप लिफ्टच्या बाहेर पड़ताना भड़क बाईचा प्रचंड रिल्याक्स चेहरा आणि माणसाचा किंचित् चूरगाळलेला सूट बापाच्या नजरेतून सुटला नाही. ही कायतरि पॉशच भानगड़ आहे एवढंच त्याला कळलंय...

दार ल्याचनं उघडून बाप परत एकदा शांत घरात आलाय. बापाची सेमिपॉश बायको बहुतेक घरात नाही. फेशियल का ब्लीचिंग ला ती जाणार होती बहुतेक...हे एक बरंच झालं असं समजून आता बापाने मोबाईल ऑन केलाय...वायफायला कनेक्ट होऊ का असं मोबाईल विचारतोय. बाप हो म्हटला तर मोबाईल नं पासवर्ड विचारलाय. बापानं कॉर्नर यूनिटच्या कोप-यात ठेवलेल्या डिवाइसवरचं स्टिकर बघितलं. #acchedinnamonamo. बापाचं पोरगं मोदीभक्त आहे हे बापाला आत्ताच कळलंय. पासवर्ड टाकलाय. मोबाईल कनेक्ट झालाय. जबरिच. वायफाय् काय थोर टेक्नॉलोजी हाय राव. शोपिमालकाने दिलेल्या ग्यानाच्या आधारे बापानं आता फेसबुक सेटअप केलंय. सगळी पर्सनल प्रोफेशनल माहिती सावकाश भरून झाल्यावर पीपल यू मे नो मध्ये बापाला आता ब्यांकेतला रघू शिपाई दिसाय लागलाय. बापानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायच्या क्षणातच रघुनं फ्रेंड रिक्वेस्ट accept केलीय. आयच्या गावात ह्याचमुळे हां रघू कायम मोबाइलला चिकटलेला असतो काय! वेलकम साहेब म्हणून वॉल्वर मेसेज आलाय आणि रघुनंच तो लाइक पण केलाय. बाप आता सुपर एक्साइटेड झालाय. पीपल यू मे नो मधून त्यानं धड़ाधड़ रिक्वेस्टा पाठवल्यात. धड़ाधड़ त्या accept होतायंत... नोटिफिकेशन्स येतायंत. बाप एकाएकी हायटेक् शहाणा झालाय. शहाण्या बापानं बापाच्या पोरीचं नाव सर्च केलंय. तिचा अत्यंत क्लास पॉश फोटो आणि त्यावरचे साडेसहाशे लाइक तीनशे कॉमेंट बघून बापाला पोरगी सेलिब्रिटी असल्याचा साक्षात्कार झालाय. बाप आता तिला फ्रेंड रिकवेस्ट पाठवायच्याच बेतात असतानाच बापाला बापाच्या पोरिचा स्टेटस रिलेशनशिप : इट्स कॉंमप्लिकेटेड असा दिसलाय. बापाच्या पोराच्या प्रोफाइलवर सुद्धा बापाला तसाच स्टेट्स दिस्लाय आणि काशिद गोवा बिचवरचे चिलिंग फोटो... तिकडं बापाच्या पोरानं आणि पोरिनं फेसबुक वरचं वॉल सेटिंग पब्लिक न ठेवता ओन्ली फ्रेन्ड्स असं जस्ट बदललंय. बापाची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करावी का नाय ह्या चिंतेत पोरिचं हंटर मध्ये मन लागनांय आणि पोराला बियरचा घोट जास्तच कडू वाटू लागलाय...

बाप आजकाल जास्त बोलत नाही. काय स्टेटस टाकाव ह्या विचारात तो शांत बसलेला असतो. फ्रेंडस ची संख्या कधीच पाचशेच्यावर गेलीय. बापाच्या सेल्फ़ी फोटोला शंभरच्या वर लाइक आलेत. पोरापोरिनं फ्रेंड रिकेवस्ट अद्याप एक्सेप्ट केली नाही. पण बाप एकंदरितच खुश आहे. दुपारची वेळ आता झटक्यात सरते. नोटीफ़िकेशन्सची किक त्याला बसू लागलीय. शांततेच्या बुलडोझरचा तो निष्णात ड्रायवर झालाय. बाप आजकाल जास्त बोलत नाही...

Comments

Hemant H. Patil said…
Lay Bhari blog


read my blogs on
http://hempatil.blogspot.in
@ Hemant Patil : धन्यवाद :)
Andy said…
Hats off..! Maan jinkakt
Aniket Samudra said…
mast lihila aahes. baryach divsanni marathiblogs ver aalo.

keep it up..keep writing
Aniket
http://manaatale.wordpress.com
It was great to find your blog suddenly. Lai bhaari.. :)
मयुर.. जब्राट लिहिलायास.....क्या बात है..
MOnty Dj! said…
Natmastak :) fataka tufaan totta jabrat ani kay kay.. Masta :)
MOnty Dj! said…
Natmastak :) fataka tufaan totta jabrat ani kay kay.. Masta :)

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी