१४ एप्रिल

तसा तू सोबतच असतोस कायम आमच्यासोबत.
जन्मापासून मरणापर्यंत
नाळ तुटल्यापासून माती होईपर्यंत
त्याच्या आधीही आणि त्याच्या नंतरही
वर्षातले तीनशे पासष्ठ दिवस
बाव्वन आठवडे  ट्वेंटी फोर बाय सेव्हन…
तूच दिलेली मुळाक्षरं, बाराखडी, व्यंजनं, सव्वीस अक्षरं
ह्या सगळ्यांची उलथापालथ करून मी झटत राहतो
तुला शब्दात पकडण्यासाठी आणि नाकाम होतो पुन्हापुन्हा.
डार्विनचा उत्क्रांतिवाद, होमोइरेक्टस होमोसेपियन
आइनस्टाइनचं काळाचं चौथं डायमेन्शन,
हिग्जबोसोनचा कण, बिग ब्यांग, स्ट्रिंग थेरी,
डार्क म्याटर डार्क एनर्जी,
शेकडो संस्कृत्या, विकृत्या, प्रकृत्या, पुराणं,
लेण्या लिप्या, गुहा, नगरं, महानगरं,
हडप्पा मोहेंजोदडो…
मी ह्यापैकी कश्शालाच मानत नाही
आमच्या माणूसपणाची सुरुवात
माणसातल्या माणुसकीची सुरुवात.
तू दिलेल्या संविधानाची लख्ख पानं
वाचत राहतो मी इथल्या अंधारात.
मी मानतो एक आणि एकच मंत्र
"स्वातंत्र्य समता बंधुत्व"
"तू होतास म्हणून आम्ही आहोत"
हा एकच प्रमेय अंतिम सत्य  मानतो मी.
ह्या इथल्या सायंटिफ़िक पसा-यातून
मी फक्त मागे जातो इथून केवळ सव्वाशे वर्ष
आणि  प्रचंड अभिमानाने ठळक करतो
आमच्या वैश्विक एवोल्युशनची
ग्रेगरियन क्यालेंडरमधली १४ एप्रिल हि तारीख.
- मयूर (१३/०४/२०१५) 

Comments

Ashwini said…
Mastach Mayur , Dr Babasaheb Ambedkar Jayantichya sarvana khup khup Shubhecha
Thanks Ashwini!! Shubhechhaa :)
Praf said…
Jai Bhim sir, can I copy paste your poem on my facebook timeline. It's awesome poem. I always read your articles on facebook.

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही