स्वप्नातला जब्या.

जब्या काल स्वप्नातच आला. बरं आला तो आला ते प्रचंड काळं डुक्कर घेऊनच. जब्याला म्हणालो जब्या हा काय प्रकार आहे? ते डुक्कर घेऊन असा कसा काय वर आलास? जब्या काही बोलला नाही. जब्या डुक्कर घेऊन सरळ माझ्या घरात घुसला. त्यानं माझ्या पॉश सोफ्याचं फयाब्रिक उसवून टराटरा फाडलं. फाडलेल्या फयाब्रिक चा भला मोठ्ठा दोर बनवून जब्यानं डुकराचे चारी पाय आन तोंड आवळलं. जब्याला म्हणालो जब्या बास झाला आं हा दळभद्रीपणा. जब्या पुन्हा काही बोलला नाही. डुकराला फरफटत नेऊन जब्या आता माझ्या बेडरूम मध्ये घेऊन गेला. आणि कर्लऑन च्या स्प्रिंग गादिवर डुकराला फेकून दिलं. भयंकर धगधगत्या नजरेने जब्यानं माझ्याकडे पाहिलं. जब्याची नजर असह्य होऊन मी डुकराकडे पाहिलं. त्या करकचुन आवळलेल्या डुकरात मला आता माझा चेहरा दिसाय लागला. जब्या आता किचन कड़े वळला. जब्यानं फ्रिज उघडला. आइस्ट्रे मधल्या बर्फाचे क्यूब्ज जब्यानं एकेक करून रिकाम्या पातेल्यात ओतले. मी जब्या वर ओरडलोच. जब्या जब्या अरे ते क्यूब्ज व्हिस्किच्या पेगसाठी ठेवलेयत. जब्या नुसता हसला. पण परत काही बोलला नाही. फ्रिजच्या टॉपवरची व्हिस्किची बाटली जब्यानं हातात धरली. जब्या प्लीज. अरे तुझ्या पाया पडतो. सोड ती बाटली. जब्यानं दुस-या क्षणीच् ती बाटली दात ओठ खाऊन फोडली. एका हातात बर्फाच्या क्यूब्जचं भांडं आणि एका हातात फुटलेल्या बाटलीचा उरलेला चाकूसारखा एक भाग धरून जब्या व्हिस्किवरून फुटलेल्या बाटलीच्या काचावरून परत बेडरूम मध्ये चालत गेला. जब्याच्या राकट पायाचे रक्ताळलेले ठसठशीत ठसे डेटॉल नं क्लीन केलेल्या चकचकित फरशीवरुन उमटत गेले. मी जब्या च्या मागे धावलो. जब्यानं एका झटक्यात कर्लऑनच्या गादिवर पडलेल्या डुकराच्या पोटात बाटली खुपसली. एकदा दोनदा तीनदा परत परत बाटली खुपसतच राह्यला जब्या. मी जब्या च्या मागे धावतच राह्यलो मात्र जब्या पर्यंत मला पोहोचता येईना. डुकराच्या रक्तानं माखलेले हात जब्यानं बर्फात फिरवले तेव्हा मला जब्या विकत असलेल्या आइसक्यांडि आठवल्या. जब्या पुढं आता मी हतबल होऊन उभा होतो. जब्यानं आता फ़क्त माझ्या पॉश घराला आग लावायचं बाकी ठेवलंय हे समजून मी खिशातून मोबाईल काढला. शंभर नंबर डायल करत अस्ताना जब्यानं मोबाइल हातातून हिसकावून घेतला. ज्या त्वेषानं जब्यानं दगड भिरकावला होता त्याच त्वेषानं आक्रोशानं जब्यानं मोबाइल भिरकावला. नवा कोरा वॉलपेपर लावलेल्या भिंतीवर आपटून मोबाइलाचे शंभर तुकडे झाले तेव्हा मला जाग आली.
सगळं व्यवस्थितच होतं. कर्लऑनच्या गादीवर जब्याचं डुक्कर नव्हतं. मीच होतो. उशाजवळ मोबाइल "सारी इसकटून जिंदगी मी पाह्यली" ह्या गाण्याची रिंगटोन वाजवत होता. बाहेर हॉल मध्ये सोफा शाबूत होता. आता मी छिनालपणे माझ्या गार्डन व्ह्यू बाल्कनीत उभाय. जब्यानं जीव तोडून भिरकावलेला तो दगड शोधायचा येडझवेपना करतोय.

Comments

pandurang said…
Apratim..lihit ja asach..anand hoto vachayla..jabya mhanje shoshit kasht karya lokansathi nehmi prerana denara character..fandry ha apratim picture ahe..

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही