अफझलखानी प्रवृत्ति आणि त्यांचे हितचिंतक

मिरज येथे गणपति उत्सवाच्या शेवटच्या काही दिवसात तणावाची स्थिति उत्पन्न होउन त्याचे रूपांतर दंगलीत झाले. त्याचे लोण पूर्ण पश्चिम महाराष्ट्रभर पसरले. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा,सोलापूर इत्यादि शहरे आणि ग्रामीण भागामध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. अजुनही वातावरण पूर्णतः शांत झालेले नसून काही ठिकाणी संचारबंदी लागू आहे.
या सर्व गोष्टींना कारण काय घडले? मिरज शहरामध्ये एका सार्वजनिक गणेश मंडळाने अफझलखान वधाची कमान उभारली. ती कमान उभी करण्यास आधी पोलिस व जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली होती, परंतु नंतर ती परवानगी देण्यात आली. त्यानंतर, अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मिरजेत मुस्लिम जमावाने निदर्शने केली. या गोष्टीला कारण ती कमान ठरली. त्या जमावाला उत्तर म्हणुन हिंदू जमाव एकत्रित झाला आणि दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी लाठीमार सुरु केला. पळून जाता जाता त्या मुस्लिम जमावातिल काही माथेफिरूंनी एका गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीवर दगडफेक करून मूर्तीची विटंबना केली. त्या नंतर भडकलेल्या दंगलीत अनेक गणेशमूर्तिंची तोडफोड आणि विटंबना करण्यात आली. या बातम्या वेगाने पसरल्या आणि त्याचे रूपांतर पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात दंगल आणि तणावाची स्थिति उत्पन्न होण्यात झाले. मुस्लिम प्रार्थनास्थळे प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या हल्ल्यांचे लक्ष्य झाली.
दरम्यान, मिरजेत गणेश मंडळांनी गणेशमूर्तिंची विटंबना करणा-या हल्लेखोरांवर पोलिस कारवाई झाल्याशिवाय मूर्ती विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली. पोलिसांनी शक्तिप्रयोग करून काही गणेशमूर्तिंचे विसर्जन करवले. तसेच त्या कमानी वरील जे अफझलखान वधाचे चित्र ही जबरदस्तीने उतरविण्यात आले. ही गोष्ट लोकक्षोभाला कारण ठरली व ठरत आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी घेतलेली एकंदर भूमिका ही दमनकारी आणि अन्याय्य असल्याची तीव्र भावना लोकांमध्ये आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी असे पोलिसी कारवाईचे वर्णन केले जात आहे.
भारतामध्ये राजकीय दृष्टया सोयीची अशी एक बोलण्याची पद्धत झाली आहे. त्याला इंग्रजी मध्ये "political correctness" असे म्हणतात. तसे पाहता ही संकल्पना पाश्चात्य आहे, पण त्यावर आपल्या लोकांइतके प्रभुत्व जगात इतर कुणाला जमले असेल असे वाटत नाही.
फक्त राजकारणीच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील लोक त्या पद्धतीचा वापर करतात. खास करून प्रसार माध्यमातील लोकांनी त्यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले असल्याचे सहज दिसून येते.
आता प्रसारमाध्यमे आणि काही राजकारणी यांनी अशाच सोयीच्या भूमिका या प्रकरणी घेणे सुरु केले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण यांनी याचा शुभारंभ केला. निवडणुका जवळ आल्याने काही राजकीय शक्तिन्नी राज्यामध्ये जातीय तणाव पसरवण्याचे षडयंत्र आखल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. हे कितपत खरेखोटे हे परमेश्वर जाणो, पण श्री.चव्हाण हिंदी चित्रपटांचे निस्सीम चाहते असल्याचा निष्कर्ष मात्र यातून नक्कीच निघतो. आपण अनेक हिंदी चित्रपटात पाहत आलोच आहोत, की कसे भ्रष्ट राजकारणी जातीय तणाव पेटवून भावा-भावाचे सख्य असणा-या लोकांमध्ये फूट पडतात आणि त्यांना मूर्ख बनवून आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजतात.
काही वर्तमानपत्रे परिस्थितीचे मोघम वर्णन करीत दोन्ही बाजूंची तितकीच चूक आहे असे भासवण्याचा प्रयत्न करतात. नव्याने सुरु झालेल्या टीव्ही चॅनेल वरील वृत्त निवेदक व संपादक, जे स्वत:ला नव्या युगातील बाळशास्त्री जाम्भेकर किंवा आगरकर समजतात, नाट्यमयरित्या हे असले शोध लावण्याचा आव आणतात आणि ढुढ्ढाचार्यासारखे लोकांना शांतता राखण्याची आवाहने करतात.
पण हे का घडले याचे प्रामाणिक विश्लेषण करण्याची इच्छा फार थोडे लोक दाखवतात. दंगलग्रस्त भागातील सामान्य माणूस जे सामान्य ज्ञान वापरून विश्लेषण करतो, ज्याला इंग्रजी भाषेत "common sense" म्हणतात ते या थोर मुत्सद्दी आणि महाज्ञानी पत्रकार लोकांच्यासाठी सोयीचे नसते.
श्री छत्रपति शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचे जे चित्र लावण्यात आले होते त्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या? आणि त्या इतक्या काय भयंकर दुखावल्या गेल्या की गणेशमूर्तिंवर दगडफेक करण्यास, त्यांची विटंबना करण्यास प्रवृत्त व्हावे? ही कोणती राक्षसी प्रवृत्ति आहे जी श्री गणेशाच्या गोंडस प्रतिमांवर असे पिसाट, रानटी हल्ले करू धजते? हे प्रश्न का विचारले जात नाही आहेत?
जनभावना अशी झालेली आहे की एकगठ्ठा मतांच्या साठी दोषी लोकांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि विरोधी पक्षाच्या लोकांची लांडगेतोड केली जात आहे. त्याचवेळी "षडयंत्र, षडयंत्र" अशी कोल्हेकुई करून गोंधळाची स्थिति उत्पन्न करण्याचा प्रयत्न होत आहे. जे पोलिसप्रमुख, ज्यांचा वर लोकांच्या रागाचा रोख आहे, ते महात्मा गांधींचा आव आणित लोकांना "कर्तव्य हाच धर्म" वगैरे उपदेश करीत आहेत.
मिरजेतिल ही घटना काही अशा स्वरूपाची एकमात्र घटना नव्हे. गेले काही वर्षे महाराष्ट्रात सणासुदीच्या काळात अशांतता माजवण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. एकूण देशालाच वेठीस धरण्याचा हा प्रकार अतिशय तिरस्करणीय असून, काही लोकांच्या अतिशय सहजपणे दुखावल्या जाणा-या भावना या सर्वसामान्य जनजीवन धोक्यात टाकत आहेत.
पश्चिम महाराष्ट्राला, काही थोडी गावे वगळता, जातीय संघर्षाची पार्श्वभूमी बिलकुल नाही. अगदी रामजन्मभूमि आंदोलन जोरात सुरु असताना सुद्धा या भागात कोणत्याही अप्रिय घटना घडल्या नव्हत्या. कुरूंदवाड गावामध्ये गणेशोत्सवात मशिदींमध्ये सुद्धा गणपति बसवतात. कित्येक उरुस हे पूर्णतः हिंदू सणांप्रमाणे साजरे केले जातात.
इथे विष कोणत्या प्रवृत्ति कालवत आहेत? इतर ठिकाणांहून शस्त्रसाठा घेउन आलेले लोक मिरज व इतर ठिकाणी पकडले गेल्याच्या बातम्या अतिशय भीतीदायक आहेत.
गेले काही वर्षे भारतात आणि जगाच्या काही इतर भागांमध्ये सुद्धा मुसलमानांमध्ये कट्टरवादाचा प्रादुर्भाव होतो आहे. त्यांच्यावर भारतात आणि जगात इतरत्र होणा-या तथाकथित अन्यायाचे भांडवल करून माथी भडकवली जात आहेत. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य फार थोडे लोक स्पष्टपणे बोलण्याचे धाडस करीत आहेत. आमचे धोरणी राज्यकर्ते सत्तासुंदरीच्या आशेने हे सत्य झाकण्याचा व्यभिचार अनेक वर्षे करीत आहेत. प्रतिष्ठा आणि मान्यतेच्या हव्यासापोटी बहुतेक प्रसारमाध्यमेही या व्यभिचाराच्या आहारी गेली आहेत. याचा अतिरेक इतका झाला आहे की हा किळसवाणा प्रकार या लोकांचा स्थायीभाव झालेला आहे.
या अशा घटना राष्ट्राच्या शरीराला झालेल्या जखमा आहेत. यावर वेळीच इलाज केला पाहिजे. औषधाने थोडे चुरचुरते, त्रास होतो, पथ्य पाळावे लागते. थोडा त्रास होतो पण अंतिमत: ते आरोग्यकारकच असते. पण दुर्लक्ष केले तर जखमा चिघळून जीव जाण्याची शक्यता असते. अशा वेळी जीव वाचवण्यासाठी सडका अवयव कापून टाकावा लागतो.

या जीवघेण्या परिस्थितीतून आपल्याला आणखी किती वेळा जायचे आहे?

Comments

Ajit said…
faar wyawasthit lihile aahe tumhi.
mi tumchyashi purnapane sahamat aahe.
Anonymous said…
Atishay maval lekhan ahe,
saral saral kalun yete ki muslim
dharjinya manasane lekh lihila aahe.
jara etha yeun bagha..dangalichi zal pochali tar asa kahi lihinaar nahi tumhi.

Popular posts from this blog

नामदेव ढसाळ : विद्रोहाचे भाषेचे करुणेचे मूर्तीमंत प्रतिरूप!

स्ट्रॉबेरी

भाकरी, पूरणपोळी आणि पिझ्झा!