'एकादशीच्या घरी शिवरात्र'

जसवतसिंगांची हकालपट्टी झालीच शेवटी. हे तसे तर फार आधीपासूनच ठरले होते. लोकसभा निवडणूकीतल्या मानहानीजनक पराभवानंतर बहुतांश भाजप नेत्यांचे डोके फिरल्यागतच झाले होते. जसवंतसिंगानीही त्याच न्यायाने वागत जराश्या वेगळ्या पद्धतीने त्यावर शिक्कामोर्तब केले इतकेच. तसे पाहिले तर लोकसभा निवडणूकांनंतर पक्षश्रेष्ठींना पत्रे पाठवून त्यांनी भाजपाच्या चिंतनशीलतेविषयी, पराभवाच्या जबाबदारीविषयी जेव्हा प्रश्ने उपस्थित केली तेव्हाच कमळावरचे भुंगे चिडले. हकालपट्टीच्या निर्णय म्हणजे सगळ्या भुंग्यांनी एका फरफटलेल्या दुस-या भुंग्याला चावा घेतला असेच म्हणावयास हवे! पुस्तकांच्या रूपाने प्रसिद्धी स्वतःकडे खेचून घेणे जसवंतसिंघांना काही नवीन नाही. ए कॉल टू हॉनरःइन सर्विस ऑफ इमर्जंट इंडिया ह्या पुस्तकातही त्यांनी वादग्रस्त विधाने खळबळ उडवून दिलीच होती. हातात सत्ता नसली म्हणजे लेखणी सुद्धा फरफटते हयाचेच हे द्योतक आहे. जिना आणि फाळणीचा चघळून चघळूनही न संपलेला प्रश्न पुन्हा उपस्थित करून जसवंतसिंघांनी नेमके काय साधले कुणास ठावूक? त्यांच्या ह्या असल्या आशाळभूत वर्तनावर ताशेरे ओढणे साहजिकच होते. पण एक बाब इथे लक्षात घ्यावयास हवी ती अशी की संघाची पार्श्वभूमी नसणारा नेता जेव्हा असे काही बोलतो तेव्हा त्याला लगेच दार दाखवले जाते. पण हाच नियम अडवाणींना का लागू का झाला नाही? अडवाणींना पार्टी अध्यक्ष पद सोडावे लागले होते हे खरे पण असा डायरेक्ट दाराबाहेरचा फुफांट रस्ता त्यांना पाहावा लागला नाही. अर्थात भाजपाची अवस्था फाटलेल्या गोधडीसारखी झाली आहे. त्यातून किती अन् काय काय ठिगळे बाहेर पडणार हे येणारा काळच सांगेल. जसवंतसिंघांच्या हकालपट्टीने भाजपाला फारसा काही फरक पडणार नाही. पण संघाकडून केली जाणारी घुसमट अशी वेगळ्या रूपाने बाहेर पडतेय हे कोण दुर्लक्षित करेल? जेव्हा भगवेपणा काम करणे बंद करतो तेव्हा विचारक्षीणतेपायी असल्या धर्मनिरपेक्षीय मर्कटलीलांचा आधार घ्यावा लागतो. एकवेळ कॉंग्रेसी नेत्याच्या तोंडी हे जिनापुराण नेहरूंना वजा करून शोभलेही असते. पण संघाच्या भगवेपणाशी हा हिरवा अट्टाहास कदापिही जुळत नाही. जुळणार नाही. तात्पर्य भाजपाची अवस्था 'एकादशीच्या घरी शिवरात्र' असल्यासारखी झाली आहे. ज्या पक्षाने खरे तर जबाबदार विरोधकाची भूमिका बजावून जनतेच्या मनात पुन्हा रुजायला हवे; त्याच पक्षात सध्या सुरू असलेल्या बिनफडाच्या कुस्त्या पाहून कॉंग्रेसी सरकारवर अंकुश ठेवण्याइतपत समजुतदारपणा भाजपाच्या अंगी अजून नाही ह्याचेच वाईट वाटते.

Comments

Unknown said…
SANGHA CHAYA NIYANTRANAT ASLELI EK SANGHATANA YA VYATIRIKTA KHAI NAHI ASHI AVASTHA AHE "BHA JA PA" CHI

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही