"वरातीमागून घोडे"

"वरातीमागून घोडे" ह्या म्हणीचा प्रत्यय पुन्हा गेल्या आठवड्याभरात सगळयांनाच आला असेल. देशात आणि विशेषतः पुण्यात स्वाईन फ्लू चे जे थैमान चालू आहे त्याने सरकार जनतेच्या आरोग्याविषयी किती संवेदनशील आहे हेच दिसून येते. कोणी म्हणेल सरसकट नेहमीच सरकारी यंत्रणेवर खापर फोडून आपण मोकळे होते. पण हे तसे नाही. लोकांनी कुणाकडे बघायचे? का नशिबाला दोष देत डोके फोडत बसायचे? ज्या वेळेस ही साथ अमेरिका, मेक्सिको मध्ये सक्रिय होती तेव्हाच तातडीने काही उपाय योजले असते तर आज ही भित भित जगायची वेळ आलीच नसती. पण आम्ही, आमचे सगळे चॅनेल्स राखी सावंतचे लगीन होईल् का, कोणासोबत होईल ह्यातच आपले सगळे कव्हरेज खर्ची घालत होते. "जनजागॄती"ची प्रक्रिया ही काही एकदोन दिवसांची नसते. तिला ठोस कार्यक्रम असावा लागतो हे ना आमच्या राज्यकर्त्यांना कधी कळले ना जनतेने कधी स्वतःहून त्यात उत्साह दाखविला. आज देशाच्या महत्वाच्या एकामागून एक शहरात स्वाईन फ्लू चे हातपाय पसरत चालले आहेत. अपुरी यंत्रणा, प्रचंड लोकसंख्या, औषधांचा तुटवडा, धास्तावलेली जनता ह्यामुळे हे चित्र अत्यंत विदारक झाले आहे. शाळा बंद ठेवाव्यात की नाही, त्यासाठीच्या कौलासाठी जनतेकडून एसेमेस मागवून घ्यावेत की नाही ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांना राजकीय परिमाणे देण्यातच सगळा वेळ खर्ची चालला आहे. मुंबईच्या आयुक्तांना सुचलेले शहाणपण पाहून तर हसावे की रडावे हेच कळत नव्हते. शाळा महत्वाच्या आहेतच ह्यात काही वाद नाही पण त्याहून अधिक विद्यार्थ्यांचे आयुष्य महत्त्वाचे आहे हे उमजायला लोकांच्या भावनांचा एसेमेस पाठवून कौल घेण्याचा विदूषकपणा विरळच! केंद्रिय आरोग्यमंत्र्यांनी तर आधीच वादग्रस्त विधाने करून अश्या नाजूक वेळेस लागणारे तारतम्य अजून आमच्या राजकीय यंत्रणेत नाही हेच दाखवून दिले. तरी ब-याच दही-हंडी मंडळांनी यावेळेसचा कार्यक्रमच रद्द करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि आशादायक म्हणावा लागेल.
गर्दी करू नये हे सांगतानाच गर्दी जमेल अश्या स्वरूपाचे समारंभही करणे टाळले पाहिजे हेही महत्वाचे आहे. पुण्या-मुंबईत ब-याच ठिकाणी नामवंत मंडळांनी दही-हंडी रद्द करन्याचा निर्णय घेतला आहे. पण तरीही ब-याच अतिहौशी खटपट्यांना "पारंपारिक" पद्धतीने सण साजरा करायची हुक्की आली आहेच हे डोळ्याआड करून चालणार नाही. "पारंपारिक" म्हणजे काय नेमके करणार ह्याविषयी कुणी चकार शब्द बोलत नाही. राजकीय शक्तीप्रदर्शनाच्या नादात जनतेच्याच शक्तीचा -हास करण्याचा अट्टाहास आणि वरून "आम्ही सगळ्यांना मास्क देवू" चा फाजीलपणा पाहून पैशाची धुंदी म्हणजे काय ह्याचाच प्रत्यय येत आहे. मास्क जर द्यायचेच होते तर ह्याआधीच देता आले नसते का? का त्या साठी दही-हंडीच्या गर्दीत सामील होण्याचे "धाडस"च दाखवायला पाहिजे? महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात आणि मुंबईत सर्वात वाईट परिस्थिती गणेशोत्सवात उद्भवण्याचा धोका आहे. कारण ह्या काळात ह्या दोन्ही शहरात जी अभूतपूर्व गर्दी जमत असते तिच्याने स्वाईन फ्लू चा राक्षसी विळखा अधिकच बळकट होण्याची चिन्हे आहेत. परंपरा , उत्सव हे मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत हे मान्य. परंतू जर मानवी आयुष्याला त्यामुळे बाधा पोहोचत असेल तर जनतेनेच शहाणे होऊन हे उत्सवांचे पिक आटोक्यात आणणे गरजेचे आहे. निदान ह्यावेळेस तरी हीच खरी गरज आहे. अन्यथा दुष्काळ तर आहेच त्यात तेरावा महिना अधिक साथीची साडेसाती असा काळ भोगावा लागल्यावर कसले आलेयत सण?

Comments

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही