हॅपी बर्थडे
हे खरे म्हणजे आम्ही दोनेक दिवसांपूर्वीच लिहायवयास हवे होते परंतु जातीवंत आळस आणि जगाविषयीचा तिटकारा आमच्यात लोणच्यासारखा मुरला असल्याने हो हो नाही नाही करत आम्ही आज लिहावयास बसलोय, म्हणजे कंपनीच्या खुर्चीवर बसलोय. तर झाले काय की नेमक्या चोवीस वर्षांपूर्वी आम्ही ह्या भूतलावर अवतीर्ण झालो आणि ह्याची आठ्वण आमच्यासहीत ब-याचजणांना होवून आम्हास उगाच म्हातारे झाल्यासारखे वाटू लागले. लहानपणापासून आम्हाला वाढदिवसाचे कधी इतके अप्रूप वाटले नाही. नाही म्हणायला 'तश्या' प्रकारचे पिक्चर्स थेटरात बघायला वयाची अठरा वर्षे पूर्ण व्हावी लागतात हे आम्हाला आमच्या एका शाळकरी दोस्ताने सांगितल्याने त्या अठराव्या वर्षी आम्ही वाढदिवसाची भयानक व्याकूळतेने वाट पाहत होतो इतके आठवते! पुढे 'तश्या' प्रकारचा पिक्चर थेटरात बघायचा योग आला नाही ही गोष्ट वेगळी. वाढदिवसाच्या दिवशी काहीही मागितले तरी मिळते असा आमचा लहानपणापासून गैरसमज आहे. पण कधीच काहीही मागण्याचे आम्हाला धाडस झाले नाही. फक्त आम्ही लहान असताना एका वाढदिवशी वडीलांना डेरी-मिल्कचे एक चॉकलेट मागावे असा विचार केला होता. पण ते सुध्दा प्रचंड महाग - म्हणजे दहा रूपयाच्या तरी आसपास असेल म्हणून मनातल्या मनातच ते खात बसलो. तेव्हाच वडिलांनी ते चॉकलेट न सांगता आमच्यासाठी आणले होते म्हणून आम्हाला कोण आनंद झाला म्हणून सांगू! आम्ही त्या दिवशी मनातल्या मनात आमच्या शाळकरी 'क्रश'सोबत ते खात खात वाढदिवस साजरा केला. आता खिशात पैसा आणि डोक्याला शिंगे आल्याने नको तेव्हा नको तितके चॉकलेट्स खाऊ शकतो पण गोड हल्ली काही घशाखाली उतरतच नाही. डेरी मिल्कच्या जाहीरातीतला उधानलेला आनंद आम्हाला तरी वास्तव आयुष्यात कधी दिसला नाही, दिसला तरी पचला नाही. एखादाच फुगा आणि वयाच्या अंकाइतक्या जळता जळता उरलेल्या छोट्याश्या मेणबत्त्या लावून साजरे केलेले वाढदिवस कधी आलिशान हॉटेलमधल्या पार्टयांपर्यंत येऊन पोहोचले हे कळले सुध्दा नाही. शिष्टावलेल्या चेह-याने 'हॅपी बर्थडे' म्हणणा-यांनी सगळाच आनंद प्रतिष्ठेचा करून टाकला आणि आपण तो गपगुमानपणे स्वीकारला देखील. शॅमेलिऑन सरड्याच्या जीभेशी स्पर्धा करणा-या आमच्या मध्यमवर्गीय अवस्था वयानुसार 'प्रगल्भ'च होत जाताहेत.फ्रस्ट्रेशनची झालर सोबत घेऊन येणारे प्रत्येक इच्छाआकांक्षांचे ढग वाढदिवसाच्या अंकासोबत वाढतच जाताहेत.जास्तच काळेनिळेगहिरे होताहेत. चालायचंच. सुरूवातीला काळ्यानिळ्या दिसणा-या जखमाही नंतर आत्मचरित्रात भांडवल म्हणून उपयोगी पडतात असे आम्ही वाचून आणि ऐकूनही आहोत.
कसे का असेनात पण हॉस्टेलमधले वाढदिवस मात्र अजूनही पार्श्वभागावरच्या लाथेच्या रूपाने स्मरणात आहेत. ही हिंसक आयडीया कुणी काढली माहीत नाही. पण हा सेलिब्रेशनच्या निमित्ताने आपली आपल्या जगण्याभोवती साचून राहिलेली सगळी चीड, सगळा संताप अश्या अभूतपूर्व लाथांमधून मोकळा करण्याचा अनोखा व्यायामप्रकार आम्हास वाटतो.शिवाय तेव्हा पुढे मागे लाथा खाण्यात आपलाच नंबर असायचा म्हणून काही राजकीय व्यक्तिमत्वे लांबूनच निदर्शने वगैरे करायची. ते दिवस प्रचंड बेभानतेचे होते. प्रत्येक वाढदिवसागणिक आपण मोठे होतोय, जबाबदारी पेलण्यात समर्थ होतोय हा विश्वास बळकट होत जायचा. पुढे कॉलेज संपलं, हॉस्टेल सुटलं आणि इथे भकास स्क्रीनसमोर येऊन कुण्या तिस-याचे आधीच सुखसागरात बुचकळून निघणारे आयुष्य आणखीनच सोयीस्कर व्हावे म्हणून केलेला बौध्दीक आटापिटा ह्यापलिकडे आमच्या 'जबाबदारी' च्या व्याख्येला काहीच अर्थ उरला नाही. वयानुसार कदाचित मनुष्यप्राण्याला बुद्धी कोठे गहाण टाकावी ह्याचा चढत्या परिणामात साक्षात्कार होत असावा असे आमचे ठाम मत आहे.
असो. आमच्यासाठी आम्ही जन्म घेऊन आलो तो दिवस 'वाढदिवस' असला तरी जगास काय त्याचे आणि आम्हास काय जगाचे? आम्ही जन्म घेतला म्हणून माणसांची कत्तल थांबणार नाही की सुदाम्याच्या पोह्याने कृष्णाच्या पोटामार्फत सा-या जगाचे पोट भरले तसे आमच्या केकच्या तुकड्याने होणार नाही! शेवटी हा सगळा 'म्युच्युअल इमोशन्स'चा खेळ आहे. प्रत्येकाने आपापल्या परिने, आपापल्या कौशल्याने खेळायचा आणि 'हॅपी बर्थडे' म्हणत / ऐकत आयुष्यावर फुटत चाललेलं वयाचं कोड स्वतःच्या वाढत्या कोडगेपणासकट अनुभवत, साहत राहायचं! विश मायसेल्फ मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!
Comments