आज्जी...

आज्जी... मी काय लिहू तुझ्याबद्दल?
मी कसं काय आवरू माझं सडलेलं समकालीनत्व?
मी रमू कोणत्या भूतकाळाच्या पिंपळफांदीवर
जेव्हा जमलाय माझ्या घरादारावर
बोन्सायछाप सावल्यांचा व्यवहारी गोतावळा?

आज्जी... कशी कशी वाचू मी
तुझ्या हयातभर विखुरलेली सुरकुत्यांची लिपी?
आज्जी... मी काय लिहू तुझ्याबद्दल?
तुझ्या स्त्री-तत्वावर इतक्याजणांनी पांढर्‍याचं काळं केलं...
मी कुठून शोधून आणू कोरडावलेल्या पिढ्यांना
शेवटपर्यंत मायेनं पोसणारे
तुझ्या गर्भातले नैसर्गिक चिवट रंग?
आज्जी... माझ्या अंगावर शिंतोडली जाणारी ही डिजीटल असाह्यता...
मी कसे काय रेखाटू तुझ्या मातीचे चित्र?
जात्यावर भरडलेल्या तुझ्या व्यथांचे गात्र?
आज्जी... ह्या अपरिहार्य वर्तमानी श्वासांची कात टाकून
कसा काय पांघरू मी माझ्या घराच्या कोनाड्यातून
ठिबकणारा तुझा एकाकी वास?

लिहून लिहून किती काय लिहू मी तुझ्याबद्दल आज्जे?
माझ्या पांढरपेशी फुफ्फुसाला वर्ज्य ठरवला गेलेला
तुझ्यातल्या जन्मदत्त करूणेचा घनघोर महारकालवा...
कसे काय घोंघावेल तुझ्या माणूसपणाचे महाकाव्य
पुसटसेही माझ्या नसानसांच्या गल्लीबोळातून??

हा माझ्या कानात गुंजतोय कसला हायटेक कल्लोळ?
ही माझ्या पिढीची आम्हीच ओढवलेली मुस्कटदाबी,
आज्जी... माझ्या कातडीवर पसरलेलं हे उच्चभ्रूपण
सोलवटून मी कसे काय ऐकू
तुझ्या पान्हाळ ओवीओवींतलं दुधाळ संगीत??

Comments

Anonymous said…
khup chan

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही