नाव नसलेले काही लेख - १

मी अत्यंत भिकारचोट झालो आहे असे मला आजकाल वाटू लागले आहे. म्हणजे बक्कळ पैसे ब्यांकेत आणि खिशात असूनही मी डेंजर भिकारी झालोय असं वाटतंय. हे भिकारपण बहुतेक आर्थिक सोडून बाकी सगळ्या ज्ञात अज्ञात प्रकारचं असावं. सामाजिक, मानसिक, शारीरिक, नैतिक, तार्किक, बौद्धिक, पारंपारिक, लौकिक, वैचारिक  आणि काय काय कुणास ठावूक! कित्येक - "इक" शब्दांत असणा-या व्याख्यांचं हे भिकारपण माझ्यापाशी गेल्या चारेक वर्षात बक्कळ जमा झालंय. पैसे सोडून बाकी काहीच आपले जवळचे "नसण्याची" ही जीवघेणी श्रीमंती मला चिक्कार वेळेस नकोनकोशी वाटते. आणि खोटं कशाला बोला - ब-याच वेळेस हवीहवीशी देखील वाटते.
मनामध्ये सतत उल्टेपालटे विचार येतात. म्हणजे काहिच्याकाहि.
उदाहरणार्थ -
आत्ता ह्या क्षणाला मी मेलो तर काय होईल? कुणाला आणि किती काय फरक पडेल?
मी लांबलेल्या, आधी असलेल्या आणि आता नसलेल्या आणि त्यातल्या त्यात  आता जवळ असणा-या मित्रांना शेवटी काय बोलेन.
फेसबुक वापरेन कि whatsapp वापरेन.
मी कितीही सिरीयस होऊन आपले शेवटचे  मनोगत त्यांना व्यक्त केले तर ते नुसता "हम्म"  असा हरामखोर रिप्लाय देतील का? किंवा काहीच बोलणार नाहीत?
किंवा आत्ता ह्या क्षणी आपल्या ओळखीचं कोणी टपकलं तर काय होईल?
ह्या क्षणी मी प्रमोट झालो तर काय होईल किंवा झटकण माझी नोकरी गेली तर मला कसे वाटेल? दीडशे किमी प्रतितास धावणा-या गाडीचे टायर फुटल्यासारखे वाटेल का? कि काहीच वाटणार नाही?
असे आणि बरेच उलट सुलट साधे सोपे क्लिष्ट विचित्र लहान सहान नागडे उघडे विचार मनात येतात.
आणि त्या क्षणाला मला भयंकर मूर्ख आणि तद्दन भिकारी असल्यासारखं वाटू लागतं. मी काहीबाही लिहू लागतो. वाचू लागतो. आत्ता जे काही लिहितोय तसंच, काहीपण, ओबडधोबड, आकार उकार असलेलं, नसलेलं.
काही अर्धवट वाचलेल्या कवितांच्या ओळी आठवू लागतो.
उदाहरणार्थ
"मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा"
किंवा
 मन कशास लागत नाही अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झ-यावर रात्री मज ऎकू येतो पावा
...
...
...
कधी कधी आयुष्य म्हणजे पांढ-या शुभ्र कागदावर  नुसते तीन ठिपके दिल्यासारखं असावं. काहीही नसावं त्याच्यावर.  साधा सरळ एका कागद. जितक्या आत्मीयतेने त्याला होडी बनवून पाण्यात सोडता यायला हवं तितक्याच निरिच्छ पणाने त्याला चुरगाळून टाकता यायला हवं. जाळता यायला हवं. कोसला मध्ये पांडुरंग सांगवीकर अजिंठ्यातल्या त्या बुद्धाला जसा  पाहतो त्याच्यासारखं सगळं पाहता यायला हवं. आयुष्यातल्या ज्या ज्या गोष्टींमध्ये हिशोब आहे अश्या सगळ्याला  इत्यंभूत आग लावून उध्वस्त करता यायला हवं. 
येणा-याला ये म्हणू नये आणि जाणा-याला थांब म्हणू नये. सगळे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाक्या शून्य मानून पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या बुद्धा सारखं सगळं काही नव्याने सुरू करता यायला हवं.
कदाचित तेव्हाच हे सर्वंकषाला चिकटून चिकटून ठोस झालेलं भिकारपण दूर होईल. आणि ते तसंच  व्हायला हवं हि अपेक्षा करण्याच्या पलिकडे आपल्याला पोहोचता यायला हवं.  त्या शुभ्र कागदावरच्या तीन फालतू तरीही  गहन ठिपक्यांसारखं. 

Comments

Popular posts from this blog

मित्र आणि साहेब.

स्ट्रॉबेरी

बाप आजकाल जास्त बोलत नाही