हॅपी बर्थडे
हे खरे म्हणजे आम्ही दोनेक दिवसांपूर्वीच लिहायवयास हवे होते परंतु जातीवंत आळस आणि जगाविषयीचा तिटकारा आमच्यात लोणच्यासारखा मुरला असल्याने हो हो नाही नाही करत आम्ही आज लिहावयास बसलोय, म्हणजे कंपनीच्या खुर्चीवर बसलोय. तर झाले काय की नेमक्या चोवीस वर्षांपूर्वी आम्ही ह्या भूतलावर अवतीर्ण झालो आणि ह्याची आठ्वण आमच्यासहीत ब-याचजणांना होवून आम्हास उगाच म्हातारे झाल्यासारखे वाटू लागले. लहानपणापासून आम्हाला वाढदिवसाचे कधी इतके अप्रूप वाटले नाही. नाही म्हणायला 'तश्या' प्रकारचे पिक्चर्स थेटरात बघायला वयाची अठरा वर्षे पूर्ण व्हावी लागतात हे आम्हाला आमच्या एका शाळकरी दोस्ताने सांगितल्याने त्या अठराव्या वर्षी आम्ही वाढदिवसाची भयानक व्याकूळतेने वाट पाहत होतो इतके आठवते! पुढे 'तश्या' प्रकारचा पिक्चर थेटरात बघायचा योग आला नाही ही गोष्ट वेगळी. वाढदिवसाच्या दिवशी काहीही मागितले तरी मिळते असा आमचा लहानपणापासून गैरसमज आहे. पण कधीच काहीही मागण्याचे आम्हाला धाडस झाले नाही. फक्त आम्ही लहान असताना एका वाढदिवशी वडीलांना डेरी-मिल्कचे एक चॉकलेट मागावे असा विचार केला होता. पण ते सुध्दा प्रचंड महाग...