तो दबून जातो कचेरीतल्या बेदम फायलींखाली...
तो दबून जातो कचेरीतल्या बेदम फायलींखाली... ती पोपडे उडालेल्या भिंतीवरून खरखरीतपणे फिरवत राहते खडबडीत झालेल्या हातांवरच्या रेषाच रेषा... तो खातो बॉसच्या शिव्याच शिव्या सवयीप्रमाणे आणि हसतो निर्लज्जासारखा वैतागत तोंडावर पट्टी बांधून... ती चढते उतरते चोवीस पाय-या पुन्हापुन्हा पाठीत सणक भरेस्तोवर कॉर्पोरेशनच्या गढूळ पाण्यासाठी झुंबडगर्दीत नळावरच्या आयाबहिणींशी पंगा घेत घेत.. तो उघडतो थंडगार झालेला डबा घरघरत्या मळकट फॅनखाली भरदुपारी गिळतो दोन थंडच थंड घास, मिसेस शर्माच्या वेणीतल्या फुलामागे दिसणा-या खिडकीच्या कळकटलेल्या काचफुटक्या भागातून मॅकडोनल्डच्या पोस्टरकडे पाहत पाहत.. ती मनातल्या मनात उतरवून घेते खरखरणा-या टिव्हीवरची भन्नाट रेसिपी आणि वाण्याच्या दुकानात जाऊन काहीच न घेता परत फिरते महागाईने मुस्काडात मारल्यागत... तो बिचकत बिचकत पोहोचतो घरी गर्दीतल्या एखाद्या अतिक्षुद्र जंतूसारखा ती उघडते पोखरलेलं दार आणि उसवते फाटलेल्या ओठांवरचं रोजचंच हसू तो काहीही न बोलता पडून् राहतो शांतच शांत , कोणत्याही क्षणी डोक्यावर पडू शकणा-या झिंगलेल्या फॅन खाली आणि हरवून जा...